पावसाच्या भीतीमुळे दांडियाचे सर्वच डोम वॉटरप्रूफ

पंचवटीत ठिकठिकाणी रंगणार दांडिया रास गरबा

पंचवटी : सुनील बुनगे

पंचवटीसह परिसरात नवरात्रोत्सवाची तयारी मोठ्या उत्साहात करण्यात आली असून, पंचवटीतील विविध ठिकाणी तसेच मखमलाबाद, आडगाव, म्हसरूळ, दिंडोरी रोड, तारवालानगर, मानेनगर आदी ठिकाणी दांडिया रास गरबाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यंदा पावसाच्या भीतीने सर्वच मंडळांकडून सर्वच मंडप वॉटरप्रूफ करण्यात आल्याने खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. इच्छुकांना निवडणुकीचे वेध लागल्याने इच्छुक मंडळींसह माजी लोकप्रतिनिधींना मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक झळ बसल्याची चर्चा आहे.
आजपासून नवरात्रोत्सव सुरू होत असून, पंचवटी परिसरातील गोदाघाटावरील सांडव्यावरच्या देवीमंदिरात यंदाही मंदिर परिसरात तयारी करण्यात आली आहे. रामकुंड येथील चतुःसंप्रदाय आखाड्यातील व्यंकटेश बालाजी मंदिरातही नवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. देवीमंदिराच्या मागे असलेल्या कालभैरव मंदिराशेजारी महिला भाविकांना घटस्थापना करण्यासाठी मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. सांडव्यावरच्या देवीमंदिराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. गाभाऱ्यात रंगरंगोटी सजविण्याचे काम सुरू असल्याने सध्या गाभारा बंद करण्यात आलेला आहे. मंदिराच्या परिसरात मंडप उभारून मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई केली जात आहे.
देवीभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या या देवीमंदिरात भाविकांची दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन नियोजन करण्यात येत आहे. रामकुंड येथील
चतुःसंप्रदाय आखाड्याच्या श्री व्यंकटेश बालाजी भगवान मंदिरात नवरात्रोत्सवात ग्रंथराज श्रीमद्‌‍ दासबोध सामुदायिक पारायण, रथयात्रा, कलशयात्रा, श्रीरामविजय, रावणदहन आदी कार्यक्रम होणार आहेत. या कार्यक्रमांची मंदिरात तयारी सुरू आहे.
घटस्थापनेसाठी लागणाऱ्या परड्या, घट, माती, धान्य, श्रीफळ, विड्यांचे पाने, कापूस, कापूर आदींसह पूजेच्या साहित्याची दुकाने पंचवटी परिसरात ठिकठिकाणी मांडण्यात आलेली आहेत. घटस्थापनेच्या खरेदीसाठी बाजारात महिलांची गर्दी होती.

नवरात्रोत्सवाला निवडणुकीची किनार

न्यायालयाने जानेवारीअखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने माजी लोकप्रतिनिधींसह अनेक इच्छुक मंडळींकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे यंदा माजी लोकप्रतिनिधींसह अनेक इच्छुक मंडळींना आर्थिक झळ सहन करावी लागली आहे. यावर्षी अनेक नवीन मंडळांकडून दांडिया रास गरबाचे आयोजन करण्यात आले आहे.

मानेनगरला गरबा रास दांडिया

माने फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भाजपा नाशिक महानगर उपाध्यक्ष धनंजय (पप्पू) माने व माजी नगरसेविका प्रियंकाताई माने यांच्या माध्यमातून भव्य दिव्य जर्मन हँगरचा वॉटरप्रूफ डोम (मंडप), आकर्षक स्टेज सजावट, आकर्षक झुंबर, विद्युत रोषणाई, गरबा खेळण्यासाठी
कार्पेट, रहाटपाळणे आदी असून, मानेनगर गरबा रास दांडियामध्ये उत्तम व्यवस्था केली आहे.

शिवतांडव युवा प्रतिष्ठान, मखमलाबाद

मखमलाबाद येथील शिवतांडव युवा प्रतिष्ठानचे संस्थापक गणेश काकड यांच्या वतीने मखमलाबाद येथे खंडेराव मंदिराजवळ गेल्या तीन-चार वर्षांपासून रास गरबा दांडियाचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी उत्कृष्ट रास गरबा दांडिया खेळणाऱ्या महिलांसाठी विविध आकर्षक पारितोषिके असल्याने या ठिकाणीदेखील महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तसेच गामणे मळा येथेही गामणे मळा कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनेदेखील मोठ्या प्रमाणात रास गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *