नवरात्रोत्सव आणि साडेतीन शक्तिपीठे

गणेशोत्सव संपल्यानंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात नवरात्रोत्सवाचे वेध लागतात. नवरात्रोत्सव हा देशात साजरा केला जातो. हिंदू धर्मानुसार नवरात्रोत्सव हा वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. पहिला नवरात्रोत्सव हा चैत्र महिन्यातील चैत्र नवरात्री आणि दुसरा आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रोत्सव. चैत्र नवरात्र हा चैत्र महिन्याच्या प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत साजरा केला जातो.
मुख्यत्वे तो उत्तर आणि पश्चिम भारतात साजरा केला जातो. दुसरा नवरात्रोत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. दुसऱ्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हा सर्वांत लोकप्रिय आणि महत्त्वपूर्ण उत्सव आहे. हा नवरात्रोत्सव हिंदुस्थानात साजरा केला जातो. तो आबालवृद्धांपासून ते आताच्या तरुणाईपर्यंत मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. नवरात्रोत्सवात देवीशक्तीचे जागरण महत्त्वाचे मानले जाते. प्राचीन काळापासून नवरात्र व्रताची उपासना केली जाते.हा उत्सव म्हणजे शक्ती देवतेचा उत्सव असतो.
हा नवरात्रोत्सव प्रामुख्याने नवरात्र व्रत, दुर्गा पूजोत्सव, शारदीय नवरात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. हा नवरात्रोत्सव देवीशक्तीचे म्हणजे स्त्रीशक्तीचे प्रतीक मानले जाते. कारण शारदीय नवरात्रोत्सव आई शक्तीच्या नऊ रूपांना समर्पित आहे म्हणून तिला नवदुर्गा म्हणतात.
देवीची नऊ रूपे अशी ः दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री, 2) ब्रह्मचारिणी 3) चंद्रघटा 4) कूष्मांडा 5) स्वंदमाता 6) कात्यायनी 7) कालरात्री 8) महागौरी 9) सिद्धीरात्री, अशा तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. या नऊ नावांशिवाय दुर्गादेवीला 108 नावांनीदेखील ओळखले जाते.
नवरात्रोत्सव हा असा उत्सव आहे की, संपूर्ण हिंदुस्थानात साजरा केला जातो; परंतु प्रत्येक राज्याची संस्कृती आणि परंपरा वेगळी आहे. त्यानुसार प्रत्येक राज्यात सण साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी पाहायला मिळते. काही राज्यांत अतिशय कटाक्षाने केवळ देवीची पूजाअर्चा याला प्राधान्य दिले जाते. या उत्सवाला प्राप्त होणारे यात्रेचे स्वरूप हा त्या-त्या राज्याच्या सांस्कृतिक जीवनाचा भाग असतो. गुजरातमध्ये गरबा व दांडिया-रास खेळून नवरात्रोत्सव साजरा केला जातो. उत्तर भारतात नवरात्र प्रभू श्रीरामाचा विजय म्हणून साजरे केले जाते. विजयादशमीच्या दिवशी रावणाचा वध केला जातो. पश्चिम बंगालमध्ये हा उत्सव दुर्र्गोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्याचे काहीसे स्वरूप हे महाराष्ट्रातील गणेशोत्सवासारखे असते. दक्षिण भारतात नवरात्रात पहिले तीन दिवस लक्ष्मीपूजन, पुढचे तीन दिवस दुर्गापूजन आणि शेवटचे तीन दिवस सरस्वती पूजन केले जाते. हा उत्सव ‌’उगादी‌’ म्हणूनही साजरा केला जातो. अशाच काही वेगळ्या पद्धतीने पंजाब, ओडिशा, हरियाणा आदी राज्यांत साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गणेशोत्सवापेक्षा नवरात्रोत्सवाचे स्वरूप वेगळे आहे. महाराष्ट्रात नवरात्रोत्सव हा विविध पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो. देशात एकूण 102 शक्तिपीठांपैकी महाराष्ट्रातील कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि सप्तशृंगगडावरील (वणी) सप्तशृंंगीदेवी, अशी साडेतीन शक्तिपीठे सुप्रसिद्ध आहेत. सगुणरूपी शक्तिपीठात ओंकारामध्ये अ कारपीठ माहूर, उ कार पीठ तुळजापूर, म कारपीठ कोल्हापूर आणि अर्ध मात्रा सप्तशृंंगी तीर्थक्षेत्र, अशा साडेतीन मात्रा आहेत. देवीच्या वास्तव्याची प्रामुख्याने साडेतीन शक्तिपीठे आहेत. ही शक्तिपीठे देवीच्या उपासनेची काही विशिष्ट स्थाने म्हणून ओळखली जातात. प्रत्येक शक्तिपीठाच्या ठिकाणी एक भैरव आणि एक शक्ती असते, अशी श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी पहिले शक्तिपीठ कोल्हापूरच्या करवीरनगरीतील अंबाबाई महालक्ष्मी मंदिर आहे.हे मंदिर कोणी बांधले याबाबत काही माहिती नाही. पण हे मंदिर शिलहारापूर्वी करहारक (कऱ्हाड) येथील सिंदवशी राजाने बांधले असावे, असे काही संशोधक म्हणतात. महाक्ष्मीची मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभी करण्यात आली आहे. गरुड, सभामंडप 1844 ते 1867 च्या दरम्यान बांधण्यात आला. करवीरनगरी ही दक्षिण काशी म्हणूनसुद्धा प्रसिद्ध आहे. या मंदिराचे बांधकाम अशा पद्धतीने करण्यात आले आहे की, वर्षातून केवळ दोन दिवस सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात. आश्विन नवरात्रोत्सवात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा याठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथऱ्यावर ठेवून तिची पूजा केली जाते. लक्ष्मीने कोल्हासुर राक्षसाचा वध केल्यानंतर नगराचे नाव कोल्हापूर पडले. करवीर क्षेत्र श्रीमहालक्ष्मीचे आवडते स्थान. इथे नतमस्तक होणाऱ्या भक्ताला पावन होते. हे महामातृक स्थान आहे. इथे मूळ आदिमाया, आदिशक्ती भगवती, महाकाली, महाशक्ती आणि महासरस्वती विराजमान आहेत.
महाराष्ट्रातील दुसरे शक्तिपीठ धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानीदेवी. तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. आई तुळजाभवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. तुळजापूर गाव बालघाटाच्या एका कड्यावर वसले आहे. हे मंदिर यादवकालीन मानले जाते. ही देवी आदिशक्ती पार्वती मातेचे स्वरूप आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे.छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवता. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात नेहमीच देवीच्या दर्शनासाठी येत असत. देवीने ककरसुराचा वध केला होता. भक्तांच्या हाकेला धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारी म्हणून देवी तुळजाभवानी ओळखली जाते. नवरात्रोत्सव हा नऊ दिवसांचा असला, तरी तुळजापूरला मात्र हा उत्सव 21 दिवस चालतो. अशी ही तुळजाभवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे.
माहूरची रेणुकामाता ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ आहे. माहूर गडावर मंदिर आहे.रेणुकामाता ही परशुरामाची माता म्हणून ओळखली जाते. या देवीला एकवीरा, यमाई तसेच येल्लामा असे विविध प्रांतांत संबोधले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवाराची ही कुलदैवत आहे. देवीचे मंदिर 13 व्या शतकात बांधले गेले आहे. याच ठिकाणी दत्तात्रयांचा जन्म झाला, असे भाविकांत म्हटले जाते.
नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगगडावरील (वणी) सप्तशृंगीदेवी. महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ आहे. सप्तशृंंगी देवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजले जाते. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंंगीदेवी असेही मानले जाते. आदिशक्तीचे मूळस्थान आहे असे मानले जाते. विष्णूंनी सुदर्शन चक्राचा वापर करून सतीच्या शरीराचे जे तुकडे केले होते, ते भारतीय खंडात वेगवेगळ्या ठिकाणी पडले. सतीचा उजवा हात आज सप्तशृंंगीदेवी मंदिर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी पडल्याचे मानले जाते.
पौराणिक कथेनुसार महिषासुर या असुराचा नाश केल्यावर तपसाधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. या गडावर सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाला सप्तशृंग हे नाव पडले.देवीचे अठरा भुजा सप्तशृंंग रूप येथे पाहावयास मिळते. देवीची मूर्ती स्वयंभू आहे. शक्तीद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत. या तिन्ही दरवाजांतून देवीचे दर्शन घडते. देवीचे दर्शन घेण्यासाठी एका बाजूने 472 पायऱ्या आहेत. चढणीचा मार्ग असून दर्शन घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने परतीचा मार्ग आहे. या मंदिराचा उल्लेख देवी भागवत पुराणामध्ये करण्यात आला आहे.देवीचे आध्यात्मिक महत्त्व मोठे आहे.
साडेतीन पीठांच्या पवित्र स्थानी भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी जात असतात. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांव्यतिरिक्त जी अनेक मंदिरे आहेत, त्या मंदिरांतही नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. जागरण, गोंधळ, देवीची आख्याने होतात. नवरात्रोत्सव म्हणजे शक्तिदेवीचा उत्सवच असतो; परंतु समाजाभिमुखतेला प्राधान्य दिले पाहिजे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *