गोदाघाटावर खोदकाम करताना आढळले पुरातन शिवमंदिर

पंचवटी : प्रतिनिधी
गोदाघाट परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या ’रामकाल पथ’ प्रकल्पाच्या कामादरम्यान प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळून आले.
दुतोंड्या मारुती मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या पायर्‍या तोडण्याचे काम सुरू असताना हरिहर भेट आणि सोमवारच्या मुहूर्तावर नंदीसह प्राचीन शिवलिंग, तसेच पुरातन मंदिराचे अवशेष आढळले. याच परिसरात आणखी एका प्राचीन मंदिराचे अस्तित्वही समोर आले आहे. विशेष म्हणजे, सन 1917 मधील सिटी सर्व्हे कार्यालयाच्या अधिकृत नकाशामध्ये या परिसरातील एकूण पाच प्राचीन मंदिरांची स्पष्ट नोंद असल्याचा दावा गोदाप्रेमी सेवा समितीचे अध्यक्ष देवांग जानी यांनी केला आहे. या मंदिरांच्या नावावरूनच हा परिसर प्रसिद्ध ’पाच देऊळ कुंड’ म्हणून ओळखला जात असल्याचे त्यांनी नमूद केले. नाशिकची ओळख प्राचीन मंदिरे, कुंडे, घाट आणि धार्मिक परंपरांमुळे देशभरात आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर गोदाघाट परिसरात विविध विकासकामे हाती घेण्यात येत आहेत. मात्र, विकासाच्या नावाखाली शेकडो वर्षांचा ऐतिहासिक वारसा नष्ट होऊ नये, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. आढळून आलेले शिवलिंग, नंदी आणि मंदिरांचे अवशेष यांची तज्ज्ञ पुरातत्त्व अधिकार्‍यांकडून पाहणी करून त्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने जतन व संवर्धन करावे, अशी अपेक्षा जानी यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर गोदाप्रेमी सेवा समितीने महापालिका आयुक्तांकडे प्राचीन मंदिरांचे अवशेष आढळलेल्या विशिष्ट भागातील जड यंत्रसामग्रीद्वारे सुरू असलेले तोडकाम आणि खोदकाम तातडीने थांबवून संबंधित जागेचे संरक्षण करावे. सन 1917 च्या सिटी सर्व्हे नकाशाची प्रत्यक्ष जागेशी पडताळणी करून नोंद असलेल्या पाचही मंदिरांची नेमकी स्थाने निश्चित करावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

हेरिटेज वारसा म्हणून समावेश करा
पाच देऊळ कुंड परिसराची ऐतिहासिक ओळख अबाधित ठेवून या प्राचीन मंदिरांचा ’रामकाल पथ’ प्रकल्पात हेरिटेज वारसा म्हणून सन्मानपूर्वक समावेश करावा. त्यामुळे देश-विदेशातून नाशिकमध्ये येणार्‍या भाविक आणि पर्यटकांना शहराच्या प्राचीन इतिहासाचे दर्शन घडू शकेल. महापालिका आयुक्तांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून संबंधित अधिकारी व कंत्राटदारांना आवश्यक निर्देश द्यावेत, असे आवाहन देवांग जानी यांनी केले आहे.

 

Ancient Shiva temple discovered during excavation at Godaghat

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *