उत्तर भारतातून येणार्या थंड वार्यांचा महाराष्ट्रावर प्रभाव
सिन्नर : प्रतिनिधी
राज्यात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा थंडीच्या दृष्टीने अनुकूल ठरण्याची शक्यता आहे. पुढील दहा दिवसांत महाराष्ट्रातील तापमानात घट होऊन थंडीचा प्रभाव वाढू शकतो. विशेषतः विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली या आठ जिल्ह्यांमध्ये थंडीचा जोर अधिक जाणवण्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रावर जमिनीपासून सुमारे तीन किलोमीटर उंचीपर्यंत प्रत्यावर्ती चक्रीय वार्यांची स्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील हवेचा दाब 1014 हेक्टोपास्कलपर्यंत टिकून आहे. वाढलेल्या हवेच्या घनतेमुळे पहाटेच्या वेळी राज्याच्या भूभागावर थंडीचे संक्रमण होत आहे. त्यातच उत्तर भारतातील हवेचा दाब 1016 हेक्टोपास्कलपर्यंत वाढल्याने तेथील बर्फाळ थंडी ईशान्येकडून वाहणार्या थंड व कोरड्या वार्यांद्वारे महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता आहे. अकवान चक्रीवादळाने दिशा बदलल्यानेही महाराष्ट्रातील थंडीला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत थंडीचा प्रभाव चांगलाच जाणवू शकतो.
दरम्यान, वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्याने दव पडण्याचे प्रमाण मर्यादित राहण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांच्या दृष्टीने ही बाब फायदेशीर ठरू शकते. येत्या पंधरा दिवसांत अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता नसून, महाराष्ट्रातही पावसाचे संकेत नाहीत.
The intensity of the cold will increase across the state over the next ten days.