– प्रशांत पोतदार
काही गोष्टींचं कारण आपल्याला कधीच कळत नाही.
कुणीतरी मनापासून हसतं आणि आपल्यालाही हसू येतं.
कुणीतरी एखाद्याला मदतीचा हात देतो आणि मनात कुठेतरी काहीतरी हलतं.
कुणीतरी स्वतःच्या वाट्याचा आनंद दुसर्याला देतो आणि आपण त्या क्षणाचे नकळत साक्षीदार होऊन जातो.
का होतं असं?
कधीकधी मला स्वतःचंच आश्चर्य वाटतं.
मी इतक्या सहज प्रेमात कसा पडतो?
नाही… हे प्रेम एखाद्या व्यक्तीच्या रूपावर पडलेलं नसतं. तिच्या बोलण्यावरही नाही. मग नेमकं कशाच्या प्रेमात पडतो मी?
जिथे काहीतरी चांगलं घडतं, जिथे चांगली माणसं भेटतात, जिथे एखाद्या चांगल्या विचाराला कृतीची जोड मिळते, जिथे माणुसकी अजून जिवंत असल्याची जाणीव होते… तिथे माझं मन नकळत थांबतं.
…आणि मी प्रेमात पडतो.
एखादा विद्यार्थी स्वतःची अडचण विसरून मित्राला अभ्यास समजावून सांगतो…
कुणीतरी अनोळखी माणूस रस्त्यावर पडलेल्या व्यक्तीला उठवतो…
बसच्या गर्दीत एखादी व्यक्ती शांतपणे आपली जागा एखाद्या वृद्धाला देते…
रस्त्यावर कुणाचं पाकीट किंवा एखादी वस्तू सापडते आणि कुणीतरी ती स्वतःकडे न ठेवता मालकापर्यंत पोहोचवतो…
कुणीतरी भुकेल्या माणसाला अन्न देतो आणि त्याचा फोटो काढण्याचीही गरज त्याला वाटत नाही.
अशा छोट्या-छोट्या कृतींच्या मी प्रेमात पडतो.
कारण चांगुलपणा नेहमी मोठ्या कामांमध्येच दिसतो असं नाही.
कधी तो एका छोट्याशा हसण्यात असतो.
कधी एखाद्याला शांतपणे ऐकून घेण्यात असतो.
कधी तुम्ही ठीक आहात ना? एवढं विचारण्यात असतो. तर कधी एखाद्याला पडताना हात देण्यात असतो.
माणुसकीला मोठ्या व्यासपीठाची गरज नसते.
ती कुठेही दिसू शकते…
चहाच्या टपरीवरच्या एका साध्या माणसाच्या वागण्यात, रुग्णालयाच्या बाहेर अनोळखी व्यक्तीला दिलेल्या धीराच्या दोन शब्दांत, शाळेच्या बाकावर मित्रासाठी सरकलेल्या जागेत किंवा घराच्या दारात थकून आलेल्या माणसासाठी ठेवलेल्या एका ग्लास पाण्यात…
आणि अशा क्षणी मला पुन्हा एकदा माणसांवर प्रेम वाटू लागतं.
मोठेपणाची व्याख्याही मला तिथेच नव्याने समजते.
एखादा मोठ्या पदावरचा माणूस छोट्या माणसाशीही तितक्याच आदराने बोलतो…
एखादा यशस्वी माणूस आपल्या यशाचं श्रेय इतरांना देतो…
एखादा शिक्षक विद्यार्थ्याच्या प्रश्नाला कंटाळत नाही…
एखादा डॉक्टर रुग्णाच्या भीतीकडे फक्त आजार म्हणून नाही, तर माणूस म्हणून पाहतो…
एखादा अधिकारी आपल्या अधिकारापेक्षा आपल्या जबाबदारीला महत्त्व देतो…
अशा माणसांच्या मी प्रेमात पडतो.
मला पदापेक्षा माणूस मोठा वाटतो.
जिथे भांडणाची शक्यता असते तिथे कुणी संवाद निवडतो…
जिथे दोष देणं सोपं असतं तिथे कुणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो…
जिथे सगळे तमाशा पाहत उभे असतात तिथे कुणीतरी मदतीसाठी पुढे सरसावतो…
अशा घटनांच्या मी प्रेमात पडतो.
आपल्या आजूबाजूला चांगल्या गोष्टी घडत नाहीत असं आपण अनेकदा म्हणतो. समाज बदलला, माणसं बदलली, संवेदना कमी झाल्या असंही वाटतं.
पण कधीकधी मला वाटतं, आपण वाईट गोष्टींकडे जरा जास्त पाहतो.
चांगुलपणा अजूनही आहे.
फक्त तो गाजत नाही.
तो बातमी बनत नाही.
तो घोषणा देत नाही.
तो स्वतःची जाहिरात करत नाही.
तो कुणाच्या तरी आयुष्यात शांतपणे येतो… आणि तितक्याच शांतपणे निघून जातो.
एखादा मुलगा आपल्या वृद्ध आईचा हात धरून रस्ता ओलांडतो.
एखादी मुलगी कामावरून दमून आलेल्या आईला स्वयंपाकात मदत करते.
एखादा मित्र चुकीच्या निर्णयापासून दुसर्या मित्राला थांबवतो.
एखादा शेजारी आजारी माणसासाठी औषध आणून देतो.
एखादी व्यक्ती आपल्या दुःखात असूनही दुसर्याच्या चेहर्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करते.
हीच तर माणुसकी आहे.
आणि या माणुसकीच्या मी प्रेमात पडतो.
मला चेहर्यापेक्षा आचरण सुंदर वाटतं.
शब्दांपेक्षा कृती बोलकी वाटते.
मोठेपणापेक्षा साधेपणा भावतो.
आणि संपत्तीपेक्षा मनाची श्रीमंती अधिक आकर्षित करते.
काही माणसं पहिल्याच भेटीत आपली वाटतात.
काही घटना मनात कायमच्या घर करून राहतात.
काही क्षण संपून जातात, पण त्यांची ऊब मात्र मनात बराच काळ राहते.
कदाचित यालाच प्रेम म्हणत असावेत…
पण माझं हे प्रेम थोडं वेगळं आहे.
मला व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नसतं…
मला त्या व्यक्तीत दिसणार्या चांगुलपणाच्या प्रेमात पडायचं असतं.
माझं प्रेम कधी एखाद्या माणसात सापडतं, कधी एखाद्या कृतीत, कधी एखाद्या विचारात, तर कधी एखाद्या अनपेक्षित क्षणात.
जिथे एखाद्याच्या चांगल्या कृतीने दुसर्याच्या आयुष्यात थोडासा प्रकाश पडतो…
जिथे दुसर्याच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी माणसं दिसतात…
जिथे एखादा माणूस स्वतःच्या वाट्याचा थोडासा आनंद दुसर्याला देतो…
जिथे कुणीतरी माफ करण्याइतका मोठा होतो…
जिथे कुणीतरी अहंकार बाजूला ठेवून चला, पुन्हा नव्याने सुरुवात करूया म्हणतो…
जिथे संवेदनशीलता अजून जिवंत असल्याची जाणीव होते…
तिथे माझं मन नकळत थांबतं.
आणि मग मला जाणवतं…
जग अजूनही सुंदर आहे.
फक्त त्या सौंदर्याकडे पाहण्यासाठी आपल्याकडे थोडा वेळ हवा.
कदाचित म्हणूनच मी इतक्या सहज प्रेमात पडतो…
चांगुलपणाच्या…
माणुसकीच्या…
प्रामाणिकपणाच्या…
संवेदनशीलतेच्या…
निःस्वार्थ भावनेच्या…
एखाद्या सुंदर विचाराच्या…
एखाद्या छोट्याशा कृतीच्या…
एखाद्या अनपेक्षित माणुसकीच्या क्षणाच्या…
अशा गोष्टींच्या, अशा माणसांच्या, अशा घटनांच्या…
मी प्रेमात पडतो…
…and I fall in love!
- कुबेर जाधव केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या…
- अशोक थोरात गैरकारभार, घोटाळे, अफरातफर, लाच घेणार्यांसाठी सीबीआय, ईडी, लाचलुचपत प्रतिबंधकसह काही संस्था देशात…
- आनंदा जाधव काही दशकांपूर्वी राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यांत साखर कारखानदारी बहरली होती. मुबलक उसामुळे अगदी…
- गोरख काळे गरीब कुटुंबातील महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उदात्त हेतूने नाशिक महापालिकेच्या महिला व बालकल्याण…
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव, आनंदाची उधळण, नात्यांमधील गोडवा आणि नव्या आशांचा जागर. घराघरांत दिवे लागतात,…
अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो 20 ते 22 ऑक्टोबर 2026 या कालावधीत भारत भेटीवर होते. त्यांच्या…