अंजनी पुत्र पवनसुत नामा

’बजरंग बली की जय’च्या जयघोषात हनुमान जयंतीचा उत्साह

नाशिक ः प्रतिनिधी
हनुमान जयंती काल (दि.2) शहर आणि उपनगरांतील विविध मंदिरांमध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे पाच वाजता अभिषेक, सकाळी सहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. त्यानंतर महाआरती करण्यात आली. नंतर सामूहिक हनुमान चालीसा पठण करण्यात आले. यावेळी भाविकांनी गर्दी केली होती. शहर आणि उपनगरांतील हनुमान मंदिरांत मोठ्या प्रमाणात प्रसाद वाटप करण्यात आले. ’बजरंग बली की जय’च्या जयघोषात शहर भक्तिमय झाले होते.
हनुमान जयंतीनिमित्त गुरुवारी शहरासह पंचवटी परिसरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पहाटेपासूनच विविध मारुती मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दिवसभर महाअभिषेक, आरती, भजन-कीर्तन, हनुमान चालीसा पठण तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
आगरटाकळी येथील गोमय मारुती मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर, पंचवटी परिसरातील अहिल्याराम व्यायामशाळेजवळील दुतोंड्या मारुती, तपोवनमधील बटुक हनुमान, सराफ बाजारातील सोन्या मारुती तसेच आडगाव नाका परिसरातील काट्या मारुती, तसेच मुंबई नाका येथील टॅक्सी स्टॅन्डजवळील या प्रमुख मंदिरांमध्ये विशेष पूजाविधी व आकर्षक सजावट करण्यात आली होती. या ठिकाणी दिवसभर प्रसाद वाटप करण्यात आले. यावेळी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रामकुंड व गोदाकाठ परिसरातही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी हुनमानाच्या पूजेसाठी भाविकांनी पहाटेपासून रांगा लावल्या होत्या. फळे, फुले विके्रत्यांनी हनुमानाच्या आवडीची मानली जाणारी रुईची माळ, नारळ आदी दुकाने थाटली होती.अनेक भाविकांनी यानिमित्ताने भंडार्‍याचे आयोजन केले होते. शहर आणि उपनगरांतील मारुती मंदिरांमध्ये प्रसादाचे वाटप करण्यात आले.
याशिवाय, हनुमानाचे जन्मस्थळ मानल्या जाणार्‍या अंजनेरी पर्वत परिसरातही भाविकांची मोठी उपस्थिती होती. अनेक भक्तांनी ट्रेकसह दर्शनाचा लाभ घेतला. एकूणच नाशिक शहर व परिसरात हनुमान जयंती पारंपरिक श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात मोठ्या प्रमाणावर साजरी झाली.

सोशल मीडियावर उत्साह
सध्या सारासर बालाजी म्हणजेच बजरंग बली हनुमानाच्या या गीताचा ट्रेंड असल्याने ’सीतारामजी के चरणो के दास बालाजी भक्तो के दास बालाजी’ या गीताला अधिक पसंती असल्याचे दिसले. याशिवाय जय श्रीराम, हनुमान अष्टक, सकंटमोचन नाम तिहारो, जय हनुमान ज्ञान गुण सागर, राम-लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, हनुमान चालीसा, हनुमानाची आरती आदी शांत, भक्तिमय गीतांसह भजन आदी गीते लावण्यात आली होती.

Anjani son Pawansut Nama

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *