सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाला मिळणार दिशा, मुख्यमंत्री उपस्थित राहणार
नाशिक ः प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची 4 व 5 एप्रिल रोजी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशभरातील साधू, संत व महंत मोठ्या संख्येने या परिषदेस उपस्थित राहणार आहेत.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.
नाशिक येथील श्री स्वामीनारायण मंदिर, बीएपीएस, के.बी.एच. डेंटल कॉलेजच्या पाठीमागे, तपोवन येथे होणारी ही राष्ट्रीय बैठक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे नियोजन करण्यात येत आहे. प्रशासन आणि संत समाज यांच्यातील समन्वय अधिक बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी साधू-संतांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे ठरते. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री पूज्य स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज यांची मंत्री महाजन यांनी नुकतीच भेट घेऊन बैठकीच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री माधव राठी उपस्थित होते. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी संत समाजाचे मार्गदर्शन पुढील वाटचालीसाठी निश्चितच बळ देणारे ठरेल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
या राष्ट्रीय बैठकीत कुंभमेळ्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार असून, साधू-संतांच्या निवासव्यवस्था, धार्मिक परंपरांचे जतन, शिस्तबद्ध आयोजन, भाविकांच्या सोयीसुविधा आणि सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत. अखिल भारतीय संत समितीच्या आगामी राष्ट्रीय परिषदांच्या आयोजनाबाबतही या बैठकीत रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये होणारी ही राष्ट्रीय बैठक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनाला ठोस दिशा देणारी ठरणार असून, प्रशासन आणि संत समाज यांच्या संयुक्त प्रयत्नांतून एक भव्यदिव्य आणि सुव्यवस्थित कुंभमेळा साकारण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
संत समितीचे राष्ट्रीय बैठकीच्या नियोजनासाठी दि. 2 रोजी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक झाली. विविध समित्या समन्वयासाठी गठित करण्यात आल्या आहेत.
National meeting of Sant Samiti to be held in Nashik from tomorrow