कोशिश करने वालो की हार नही होती

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा माहौल सर्व प्रकारचे प्रश्न. शंका. कुशंका. मुलांच्या. पालकांच्या. ताणतणाव. खंत. विचार. समजूत. आणि एकंदरीत पुन्हा चर्चा. काही एकमेकांसोबत, काही आमच्यासोबत. बोलणारे आपलेच असतात आणि त्यांचा हेतू देखील चांगला असतो. परंतु अनेकदा मी बघितले आहे की घरांमध्ये, मित्रांमध्ये, पालकांमध्ये त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा बोलल्या जातात. अभ्यास करत नाही. ऐकत नाही. करु शकते, करु शकतो, क्षमता आहे; पण मनावर घेत नाही. आमचं ऐकत नाही. आम्ही चांगल्यासाठीच सांगतो. आमच्या काळात तर आम्हाला या काहीच सुविधा नव्हत्या. आता आम्ही यांना सगळं दिलं आहे. तर यांनी किती प्रयत्न केले पाहिजेत! लं म्हणतात मला कळत नाही का. मी लहान आहे का. मला माझी जबाबदारी समजते. पण आई पप्पा मला समजूनच घेत नाहीत. त्यांना असे वाटते त्यांनाच फक्त सगळं समजतं आणि मी मनापासून प्रयत्न करत नाही…रीक्षेच्या आधी आणि परीक्षेच्या नंतर तो किंवा ती कमी जास्त प्रमाणात धास्तावलेले असतात . आई-वडील सुद्धा कधी मुलांपेक्षा कमी तर कधी मुलांपेक्षा जास्त तणावाखाली असतात. परीक्षा – मार्क हे महत्त्वाचे असले तरी सर्वस्व नाही हेच कधी कधी मुलांना आणि त्यांच्या पालकांना विसरायला हाेते

पेपर आपल्याला हवा तसा जाणे आणि मार्क आपल्याला हवे तित मिळाले की नाही हे महत्त्वाचे आहे. आणि त्यावरच ठरते आनंद-दुःखाची भावना आणि यश-अपयशाची मानसिकता .

ज्यांना मनासारखे गुण मिळाले आहेत त्यांचे अभिनंदन करावे.
ज्यांना मनासारखे नाही मिळाले त्यांनी खूप जास्त नाराज व्हायची गरज नाही.
थोडे नाराज होणे समजण्यासारखे आहे. ते स्वाभाविक आहे. त्याबद्दल प्रमाणापेक्षा खूप जास्त वाईट वाटणे मात्र उपयोगाचे नाही.

प्रत्येक परीक्षा महत्त्वाची असली तरी ही काही आपल्या आयुष्यातील पहिली आणि शेवटची परीक्षा नाही. यापूर्वी काही परीक्षा दिल्या आहेत आणि पुढेही अनेक द्यायचा आहेत. हा कदाचित एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट निश्चितपणे आहे; परंतु एका परिक्षेवर कोणत्याही व्यक्तीचे आयुष्यातील यश-अपयश ठरत नाही.

एक छोटासा खेळ खेळू. खूप जास्त विचार न करता तुम्हाला कोणती दहा नावं आठवतात यशस्वी व्यक्तींची ती लिहून काढा.
मग पुन्हा यादी बघा.
हे सर्व जण दहावी आणि बारावीला टॉपर होते का? शाळेत नेहमी पहिले दुसरे यायचे का? असे काही जरूरी नाही, हे यादीवरुन दिसेल.

केल्याने होत आहे रे आधी केलेचि पाहिजे… प्रयत्न करणे आपले कर्तव्य आहे. त्यात खोट नको. नियमितपणे मन लावून कष्ट करत राहिलो की आज ना उद्या यश मिळणार. पण मला प्रत्येक परिक्षेत यश मिळालेच पाहिजे आणि मला अपेक्षित तसेच मिळाले पाहिजे याची खात्री कोण आणि कशी देणार?

मी अभ्यास केला होता. मला चांगले (? पुन्हा एकदा वर वाचा. मनासारखे / मला हवे तितके असे म्हणायचे आहे ना ?) मार्क मिळायलाच हवे होते असे म्हणून चालणार नाही.

अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग काही कायमस्वरूपी बंद होत नाही. रस्त्यावर चालताना कधी कधी ठेच लागून जखम/ वेदना होऊ शकते. पण आपण चालणे थांबवत नाही. थोडीशी विश्रांती घेऊन, गरज वाटल्यास मलमपट्टी करून चालणे सुरूच ठेवतो.

अपेक्षेएवढे मार्क मिळाले. आता काही टेन्शन नाही, आता मी माझ्या आयुष्यात यशस्वी होणारच अशी काही आयुष्यभराची हमी तुमच्या प्रगतिपुस्तकावर लिहिली आहे का? पुढे काही करायची गरज नाही आयुष्यात अशी काही शाश्वती आहे का? नाही.

एक टप्पा पार पडला आहे. अशाच प्रकारे अजून पुढे वाटचाल करायची आहे हवे ते लक्ष्य गाठण्यासाठी.

शिक्षणाची ही सगळी वर्षे म्हणजे एक प्रवास आहे. एखादे पाऊल कधी मागे पुढे होऊ शकते. त्यामुळे हात-पाय गाळायची, धीर सोडण्याची गरज नाही.

छिछोरे चित्रपट आठवतो ना.
तुम्हारा result decide नही करता है की तुम loser हो की नही. तुम्हारी कोशिश decide करती है।

अभ्यास करून अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले असतील तर काळजी करू नका. कारण कष्टाची रसाळ गोमटी फळे आज नाहीतर उद्या मिळतीलच. कुठे कमी पडलो, कुठे सुधारणेला वाव आहे ते शोधा आणि त्यावर मेहनत घ्या.

Success के बाद का plan सबके पास है लेकिन अगर गलती से fail हो गए तो failure से कैसे deal करना है कोई बात ही नही करना चाहता…

आणि चित्रपटात शेवटी दाखवल्या प्रमाणे मनापासून प्रयत्न करुन कोणी हरले तर ती/ तो losers नसतात, तर champs असतात. विजेते! कारण ते मेहनत घेतात. स्वत:ला झोकून देतात. त्या एका लक्ष्यावर एकाग्र होतात.. अर्जुनाप्रमाणे…

म्हणुनच ज्यांना अपेक्षेप्रमाणे पेपर जात आहेत आणि मार्क मिळत आहेत त्यांचे अभिनंदन! आणि ज्यांना पुरेसे प्रयत्न करूनही नाही जमले त्यांचे देखील अभिनंदन!!
कारण तुमची हीच कष्ट घेण्याची वृत्ती तुम्हाला भविष्यात खूप मदत करणार आहे यश मिळवण्यासाठी. अपेक्षित लक्ष्य साध्य करण्यासाठी. या परिक्षेतील मार्कांपेक्षाही अधिक मोठे, अधिक महत्त्वाचे!

प्रयत्नच केले नसतील तर जास्त वाईट वाटणे स्वाभाविक आहे. परंतु पुन्हा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आज प्रयत्न नाही केलेत. चुकलात. पुढील सहा महिने, पुढील एक वर्ष या चुका दुरुस्त करण्यासाठी आहे. चुका करताना डगमगलो नाही मग चुका दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्याची काय लाज! आणि काय खंत ? हारजीत हा क्रिकेट, फुटबाॅल मॅचेस् प्रमाणे जीवनाचा अविभाज्य भाग आहे हे लक्षात घ्या.
लिओनेल मेस्सी, ख्रिस्तीयानो रोनाल्डो, धोनी, कोहली यांनी पण हृदयभेदी पराभव बघितले आहेत. परंतु एका सामन्यातील, मग तो वर्ल्डकपची फायनल का असेना, हार तुम्हाला भविष्यात कायमस्वरुपी चांगले खेळण्यापासून थोपवू शकत नाही! प्रत्येक अपयशातुन काही तरी शिकून जो पुढे सरकतो तोच मुकद्दर का सिकंदर असतो!

सर्वांनी हे लक्षात घ्या. स्वतःशी बोला. स्वतःला समजावून सांगा. मित्र मैत्रिणींबरोबर हे विचार शेअर करा. आई वडिलांकडे स्वतःच्या भावना व्यक्त करा. संकोच करु नका. आपले विचार, आपल्या भावना आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर बोलणे खूप महत्त्वाचे आहे.

जास्त मानसिक ताण, डिप्रेशन वाटत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांशी बोला. त्यांची मदत घ्या. कदाचित सर्व काही संपले, आत्महत्येसारखे विचारही काहींच्या मनात येऊ शकतात. पण लक्षात ठेवा ही एक तात्पुरती मानसिक अवस्था असते. योग्य प्रयत्नांनी आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या उपचारांनी तुम्ही निश्चितपणे यातून बाहेर पडू शकतात. आयुष्यात काही चांगलं करुन दाखवायचं आहे. एका वर्षाच्या preformance ला, एका परीक्षेला आयुष्याचे यश-अपयश ठरवायचा हक्क द्यायचा नाही आहे. तो निर्णय पुर्णपणे तुमचा स्वतःचा आहे.

लहरों से डरकर नौका पार नहीं होतीं
कोशिश करने वालों की हार नहीं होतीं l

*डॉ हेमंत सोननीस*
*मानसोपचार तज्ञ*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *