जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर समजून घेताना ..

कॉलेज मध्ये जिकडे पहावे तिथे नुसती विद्यार्थ्यांची गर्दी. अहो कारणच तसे आहे ना. जवळ जवळ दीड वर्ष ऑनलाइन कॉलेज सुरू असताना आता ऑफलाईन कॉलेज आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे कॉलेज फेस्ट चे आयोजन झाले आहे म्हणून तर आमच्या आनंदाला काही पारावर नाही. सगळे लोक अगदी जोशात कामाला लागले आहे. क्रीटीव्हीटी टीम पासून फायनान्स टीम पर्यंत, अगदी सगळे जीव ओतून काम करत आहे. पण मी समाजशास्त्र शिकते आणि जरा आपसूकच एक गोष्ट दिसून आली म्हणून तुम्हाला सांगू पाहते. फेस्ट च्या कामाचे विभाजन होत असताना, क्रीटीव्हीटी टीम मध्ये अर्ध्याहून जास्त मुली आणि फायनान्स मध्ये सगळी मुलं आणि तुरळक काय त्या मुली.
जेंडर डिव्हिजन ऑफ लेबर काय असते ते इथे प्रकर्षाने जाणवून आले बघा. मुलींना एक्सप्रेसिव्ह रोल्स आणि मुलांना इन्स्ट्रुमेंटल रोल! बरं, एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे, हे कामाचे विभाजन कोणी तिसऱ्या व्यक्तीने केले नव्हे तर मुली स्वतःहून क्रोटीव्हीटी टीम मध्ये गेल्या आणि मुलं स्वतःहून फायनान्स टीम मध्ये गेल्या. बरं, यात एक काम दुसऱ्या पेक्षा जास्त महत्वाचे असे मुळीच नव्हे. प्रत्येक काम व्यवस्थित रित्या होणे, फेस्ट च्या यशस्वी होण्यासाठी सारख्या प्रमाणात महत्वाचे आहे. पण मला प्रश्न हा पडला की कुठल्याच मुलीला फायनान्स टीम मध्ये येऊन काम करावेसे नाही का वाटले किंवा कुठल्याच मुलाला क्रीटीव्हीटी मध्ये जाऊन काम करावेसे नाही वाटले?
समाजशास्त्र मध्ये जॉर्ज मिड नावाचा एक विचारवंत होऊन गेला. त्याच्या मते, माणसाचे सोशलायझेशन होताना, तीन मुख्य स्टेज असतात. पहिली म्हणजे इमिटेशन स्टेज जिथे लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात, दुसरी स्टेज म्हणजे प्ले स्टेज जिथे लहान मुले खेळाच्या माध्यमातून शिकतात जसे की मुलांना गाड्या दिल्या जातात तर मुलींना भातुकलीचा खेळ आणि तिसरी स्टेज म्हणजे गेम स्टेज लहान मुलं प्रत्यक्षात एखादी भूमिका निभावायला शिकतात.
आणि अशा या तीन मुख्य टप्प्यांमध्येच आपण जेंडर नुसार कामाची विभागणी करतो आणि किंबहुना म्हणूनच पुढे जाऊन कुठलेही काम निवडताना जेंडर हा मुद्दा निर्णय घेताना लक्षात घ्यावा लागतो. यामुळे, एखाद्या विशिष्ट जेंडर असलेल्या व्यक्तीला जरी दुसऱ्या जेंडर ला आखून दिलेले काम करण्याची इच्छा झाली तर ते करता येत नाही आणि केले तरी त्या कृतीला ‘डेव्हीअंट ऍक्ट’ म्हणून संबोधले जाते.
मुलाला मेहंदी अथवा रांगोळी काढावी वाटली तर त्याला, ‘काय मुलींची काम करतो’ किंवा मुलीला ‘टोम्बोय’ म्हणून लेबल लावून मोकळे.
जेंडर ही संज्ञा समाजाने बनवली आहे आणि ती मोडीत देखील समाजातली माणसेच काढू शकतात.
फक्त गरज आहे ती प्रत्येक माणसाने धाडस दाखवून सुरुवात करण्याची.
‘समतेच्या वाटेने, तू खणकावीत पैंजण यावे,
तू यावं, तू यावं, बंधने तोडीत यावं’

ऋतुजा अहिरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *