आयुष्यातील उलाघाली, स्थित्यंतरे, जगण्याची विविध व्यवधाने अनुभवत असताना कवी नेहमी त्याच्या कवितेमधून डोकावत असतो. किंबहुना आपले प्रतिबिंब आपल्या लिखाणात पडतंच… पूर्णपणे अलिप्त होऊन लिहिता येणं ही खरंतर स्थितप्रज्ञताच… अशा अर्थपूर्ण मनोगतात व्यक्त झालेल्या कवयित्री डॉ. स्वाती पाटील लिखित ’निळी सावळी नव्हाळी’ हा कवितासंग्रह नुकताच वाचनात आला.
निळी सावळी नव्हाळी या कवितासंग्रहाच्या मुखपृष्ठावरून कवयित्रीच्या अंतर्मनातील स्वच्छंदी भाव प्रकट होतात. मोरपिसार्याच्या चंद्रकोरीवर बसून निळ्या नभाला हर्षोल्हासात स्पर्श करणारी प्रातिनिधिक स्त्रीपरंपरेच्या जोखडातून मुक्त झाल्याचा आनंद व्यक्त करताना दिसून येते.
मोरपिसाचा हळुवार स्पर्श स्त्रीच्या नाजूक, संवेदनशील मनाची साक्ष देतो तर त्या मोरपिसाच्या चंद्रकोरीवर बसून निळ्या ढगाला स्पर्श करणे म्हणजे स्त्रीस्वातंत्र्याची नांदी म्हणावी लागेल. स्त्री अनंत काळापासून जुन्या रूढी-परंपरेच्या साखळदंडात अडकून पडलेली होती. मन असूनही मनात स्त्री-पुरुष विषमतेची भळभळती जखम घेऊन जगत होती. आता ती मुक्त झाली आहे आणि हा मुक्तपणा मोरपिसार्यावर बसून निळ्या नभाला स्पर्श करून दाखवला आहे, असा अर्थ मला यातून जाणवला आहे. आणि म्हणूनच की काय कवयित्री डॉ. स्वाती पाटील तुझ्याकडे येईन म्हणते…या कवितेत म्हणतात की,
मोडून जगरहाटीची घट्ट जुनी चौकट,
हा समुद्र ओलांडून तुझ्याकडे येईन म्हणते
समाजव्यवस्थेने घालून दिलेली खुळचट बंधने तोडून (तोडून शृंखला), जुन्या चालीरीतीच्या चौकटी मोडून (मोडून जगरहाटीची घट्ट जुनी चौकट), हा समाजव्यवस्थेचा दूरवर पसरलेला हा विषमतेचा समुद्र ओलांडून परिवर्तनाच्या किनार्याकडे येईल. अशा गर्भित अर्थाने गुंफलेल्या कवितेच्या ओळींचा अर्थ मुखपृष्ठ चित्रकाराने आपल्या कुंचल्याने मुखपृष्ठावर रेखाटला आहे असे मला वाटते. स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या, ज्यांनी आयुष्यभर व्यवस्थेचा अंगावर शेणामातीचा अभिषेक सहन केला, दगडगोट्यांच्या माराचा वर्षाव फुलासारखा झेलला त्या स्त्रीशिक्षणाच्या पुरस्कर्त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागामुळे आजची स्त्रीशिक्षणाचा हक्क बजावत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्त्रियांवर अनंत ऋण आहेत या ऋणाचे ओझे कायम मनावर राहणार आहे यांची जाणीव सदैव कवयित्रीच्या मनाला होत आहे. म्हणूनच सावित्री माय या कवितेत व्यक्त होताना डॉ. स्वाती पाटील लिहितात की,
झालीस तू माय माझी,
माझ्यापायी राबलीस.
झेलताना शेण-गोटे अक्षरे गिरवलीस.
कवयित्री स्वच्छंदी मनाच्या वार्यात फेरफटका मारताना गतकाळाच्या निसटून गेलेल्या अनेक क्षणांना कवटाळताना दिसून येतात, कधी भावविवश होतात, तर कधी मन खिन्न होऊन आपल्याच तंद्रीत तल्लीन होऊन जातात. स्त्री म्हटले की, तडजोड आलीच. स्वतःला विसरून आकांक्षांना मुरड घालून समाजात वावरत असते. कवयित्री व्यक्त होताना म्हणतात की,
सुखदुःखाच्या हिंदोळ्यावर डोलते,
असो नसो मनी तडजोड करते.
निळी सावळी नव्हाळी या कवितासंग्रहात एकूण पंचाहत्तर कवितांना स्थान देण्यात आले आहे. स्त्रीमनाच्या संवेदना, स्त्रीचे
निसर्गाशी असलेले नाते आणि त्यातून जोडलेले भावनिक वलय यातून दिसून येते. वटपौर्णिमा, ती पुन्हा करू लागते संसार, संसार गणित, ती वाहत राहते, ओंजळ, सखे, यांसारख्या कवितांमधून कौटुंबिक संवेदना, भावभावनांचे स्थित्यंतरे अधोरेखित केले आहेत तर पाऊस तू आणि मी, व्हॅलेंटाइन, प्रीत
नव्हाळी, तू तुझी ओळख, आठवणींचा वसंतझुला, ऋणानुबंध या कवितांमधून प्रेमाविष्काराचे रूप पाहायला मिळते.
कवयित्रीला पाऊस खूप आवडतो, पावसाचे आणि कवयित्रीचे अनोखे नाते आहे आणि म्हणूनच त्यांच्या आषाढ, ओढ, वाट पाहते…, श्रावणरंग, पाऊस, आवतण, पाऊस तुझा, माझा, धुके, मन पाऊस या कवितांमधून कवयित्री मनसोक्त पावसात चिंब भिजल्याचा अनुभव घेताना दिसून येतात.
प्रसिद्ध साहित्यिक प्रा. वैद्यनाथ महाजन यांनी कोरलेल्या कवितांची काव्यलेणी अशा शब्दात संग्रहाचे वर्णन करून कवयित्रीला पुढील लेखनास प्रेरणा दिली आहे तर प्रसिद्ध साहित्यिक देविदास फुलारी यांनी ब्लर्बच्या माध्यमातून केलेली पाठराखण संग्रहाचे साहित्यिक मूल्य जपणारे असून ख्यातनाम मुखपृष्ठचित्रकार अन्वर हुसेन यांच्या कुंचल्याच्या अदाकारीने नटलेल्या मुखपृष्ठामुळे कलाकृतीला वेगळी ओळख निर्माण झाली आहे तर प्रकाशक धर्मवीर पाटील यांनी प्रतिभा पब्लिकेशनच्या माध्यमातून कलाकृतीचे प्रकाशन करून वाचकांच्या हवाली केले आहे आणि म्हणूनच ही कलाकृती अनेक राज्यस्तरीय पुरस्काराची मानकरी ठरत आहे.
तूर्तास इतकेच…
कलाकृती- निळी सावळी नव्हाळी
साहित्यप्रकार- कवितासंग्रह
कवयित्री डॉ. स्वाती पाटील, सांगली
संपर्क क्रमांक- 9503628150
मुखपृष्ठचित्रकार- अन्वर हुसेन
प्रकाशक- प्रतिभा पब्लिकेशन, ईश्वरपूर
Artwork that leads to change – Blue Shadowy Nawali
इतकेच नव्हे, तर मद्याच्या धुंदीत पोलिसांच्याच अंगचटीला जाणार्या या तरुणींनी नंतर त्यांच्यावरच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल…
सुख, शांतता, समाधान जिथे मिळते त्याला धर्म म्हणतात. धारण केला जातो तो म्हणजे धर्म. भारतीय…
स्त्रीने तिचा स्वाभिमान जपायला हवा...आणि तुम्हाला स्वतःचा अभिमानही वाटला पाहिजे...स्त्री ही अशी शक्ती आहे.संपूर्ण जगाला…
यशाची नशा आणि दिखावा मनुष्याला न्यायालयाची पायरी चढायला भाग पाडतात. हे लोभाचे चक्र आहे, ज्यामुळे…
या जगात आपण अनेक गोष्टी शिकतो अनुभवतो कमावतो, पण तरीही मनात एक पोकळी राहते. मनुष्य…
मनाला सुन्न करणार्या अनेक घटना आपल्या आसपास सतत घडत असतात. एखादी गोष्ट अशी घडते कि…