नव्या धक्कादायक खुलाशांनी तपास वेगात
नाशिक : प्रतिनिधी
नाशिकमध्ये महिलांवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या भोंदू ‘कॅप्टन’ अशोक खरात याला नाशिक सत्र न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजेच 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान समोर येत असलेल्या नव्या आरोपांमुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.
महिलांना दैवीशक्ती व भविष्याची भीती दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरातला मंगळवारी (दि.24) दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.
पोलीस कोठडी संपत असल्याने त्याला पुढील कोठडी द्यावी का, यावर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी जोरदार युक्तिवाद करत खरातविरोधात अनेक ठोस पुरावे असल्याचे सांगितले. तसेच नव्या पीडित महिला पुढे येत असून, तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने कोठडी वाढवण्याची मागणी केली.
सरकारी बाजूने न्यायालयात धक्कादायक दावे करण्यात आले. खरातकडून पिस्तूल जप्त करण्यात आले असून, त्याच्याकडे 21 जिवंत व 5 वापरलेली काडतुसे सापडल्याचे सांगण्यात आले. त्याने कथितपणे नरबळी दिल्याचा संशय व्यक्त करत, तो वापरत असलेली ‘कस्तुरी’ हरणाच्या शिकारीतून मिळवली का, तसेच तो दाखवत असलेले वाघ व साप खरे होते की बनावट, याचाही तपास आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
दुसरीकडे, खरातच्या वकिलांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुढील पोलीस कोठडीची गरज नसल्याचा युक्तिवाद केला. तपासाशी संबंधित काही बाबी माध्यमांमध्ये आधीच आल्याचा उल्लेख करत, आवश्यक पुरावे पोलिसांकडे उपलब्ध असल्याने न्यायालयीन कोठडीतही तपास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सुनावणीदरम्यान खरात शांतपणे मान खाली घालून बसलेला होता. न्यायाधीशांनी विचारल्यावर त्याने साप व वाघ याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. यानंतर न्यायालयाने पोलिसांचा युक्तिवाद मान्य करत त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
या प्रकरणात सरकारवाडा पोलीस ठाणे येथे आणखी तीन महिलांनी तक्रार दाखल केल्याने खरातविरोधातील गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. त्याच्या घरातून सुमारे 6.53 लाखांची रोकड, लॅपटॉप, रिव्हॉल्व्हर, राजमुद्रा आणि 31 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ देऊन अत्याचार केल्याचाही आरोप असून, मध्यरात्री व पहाटे पूजा विधीच्या नावाखाली शोषण केले जात असल्याचे तपासात समोर येत आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, पोलिसांकडून खरातच्या तथाकथित ‘काळ्या साम्राज्या’चा सखोल तपास सुरू असून, पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारी वकिलांनी पाच नरबळीची शंका उपस्थित करणे हे अतिशय गंभीर बाब आहे. पुरोगामी महाराष्ट्राला कलंक असणारी ही घटना आहे. यासाठीच जादूटोणाविरोधी कायद्याची गरज अधोरेखित होत आहे.आम्ही एसआयटीकडे वन्यजीव संबधात व्यक्त केलेली शंका खरी ठरली आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याचे कलम लावले जावे.
– कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, अंनिस
Ashok Kharat’s custody extended