दिंडोरी नाका परिसरात युवकावर चॉपरने हल्ल्याचा प्रयत्न

50 हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

पंचवटी/सिडको : प्रतिनिधी
दिंडोरी नाका भाजीबाजार परिसरात एका युवकाला चॉपरचा धाक दाखवत जिवे मारण्याचा प्रयत्न करून 50 हजार रुपये खंडणीची मागणी करणार्‍या दोघांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून उमेद खंडू काकवीपुरे (वय 30, रा. मल्हार खाण, गंगापूर रोड) आणि किशोर बरू (रा. ध्रुवनगर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी दिंडोरी नाका परिसरात असताना आरोपी किशोर बरू हा स्कॉर्पिओ (एमएच 15-जेओ 3002) घेऊन तेथे आला. गाडीतून चॉपर हातात घेऊन उतरलेल्या किशोरने फिर्यादीची कॉलर धरत शिवीगाळ केली. त्याच्यावर 50 हजार रुपये खर्च केल्याचा उल्लेख करत तत्काळ पैसे देण्याची मागणी करत त्याने चॉपरने वार करण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने झटका देत तेथून पळ काढला.
आरोपी हातात चॉपर घेऊन ‘थांब, तुझा मुडदा पाडतो,’ अशी आरडाओरड करत त्याच्या मागे धावत होता. यावेळी परिसरातील नागरिकही घाबरून पळापळ झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. आरोपीने पुन्हा रात्री फोन करून शिवीगाळ करत 50 हजारांची खंडणी मागितली. फिर्यादीने माहिती देताना सांगितले की, सुमारे पाच ते सहा महिन्यांपूर्वीही आरोपीने अशाच प्रकारे जीव घेण्याची धमकी देत 20 हजार रुपये जबरदस्तीने घेतले होते.
या गंभीर प्रकाराची दखल घेऊन पंचवटी पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास वपोनि पाटील, पोउनि चव्हाण आणि पोउनि जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *