वावी येथे उद्या खंडोबा महाराज यात्रोत्सव

पाचशे किलो वांग्याचे भरीत, 250 किलो बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद

सिन्नर ः प्रतिनिधी
तालुक्यातील वावी येथे बुधवारी (दि.26) ग्रामदैवत खंडोबा महाराज यात्रोत्सवा-निमित्त पहिल्यांदाच रात्रभर जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी परिसरातील दहा गोंधळ पथकांना निमंत्रित करण्यात आले आहे. 500 किलो वांग्याचे भरीत, 250 किलो बाजरीच्या भाकरीचा महाप्रसाद बनविण्यात येणार आहे.
वावी गावात घोटेवाडी रस्त्यालगत श्री खंडोबाचे पुरातन मंदिर आहे. सुमारे 20 वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्याभोवती आकर्षक बगीचा
फुलवण्यात आलेला आहे. गावातील प्रत्येक कुटुंबात लग्नकार्याची सुरुवात खंडोबा मंदिरात पूजा करून केली जाते.
घरी जागरण गोंधळासारखे देवकार्य असले, तरी या मंदिरापर्यंत देव व दिवट्या मिरवल्या जातात. चंपाषष्ठी हा खंडोबाच्या यात्रेचा दिवस असतो. यानिमित्त गावातील श्रीराम ग्रुपच्या वतीने दरवर्षी वांग्याचे भरीत व बाजरीच्या भाकरीचा प्रसाद बनवला जातो.
यंदाच्या उत्सवात सुमारे पाचशे किलो वांग्याचे भरीत आणि 250 किलो बाजरीच्या पिठाच्या भाकरी बनवून त्या भाविकांना महाप्रसाद म्हणून मंदिराच्या प्रांगणात पंगती बसवून वाढल्या जाणार आहेत. याशिवाय रात्रभर परिसरातील दहा जागरण गोंधळ पथके आळीपाळीने उपस्थित राहून जागरण करणार आहेत.
पंचक्रोशीतील भाविकांनी यात्रोत्सवाचा, तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

पंधरा वर्षांपासून महाप्रसादाची परंपरा

गेल्या पंधरा वर्षांपासून वांग्याचे भरीत आणि बाजरीच्या भाकरीचा प्रसाद बनवला जातो. गेल्या वर्षी 200 किलो बाजरीचे पीठ भाकरीसाठी आणले होते. यंदा 50 किलो बाजरीचे पीठ अधिक वापरले जाईल. सुमारे साडेतीन हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील, अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे.
– लक्ष्मण नवले, अध्यक्ष, श्रीराम ग्रुप, वावी

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *