नाशिक

वणीत चाकू हल्ल्याच्या प्रयत्नाने खळबळ

मद्यविक्री दुकानांमुळे वाढत्या गुन्हेगारीबाबत नागरिकांमध्ये संताप

दिंडोरी : प्रतिनिधी
वणी शहरातील दामोदरनगर परिसरात दि. 30 मे रोजी दुपारी घडलेल्या चाकू हल्ल्याच्या प्रयत्नामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जुन्या वादाची कुरापत काढून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी राहुल भास्कर मोरे यांच्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने राहुल मोरे यांनी प्रसंगावधान राखून वार चुकविल्याने जीवितहानी टळली.
या घटनेनंतर ग्रामस्थ व पोलिसांनी आरोपींचा सिनेस्टाइल पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतल्याने परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राहुल भास्कर मोरे (वय 35, रा. कसबे वणी, ता. दिंडोरी, जि. नाशिक) हे दामोदरनगर परिसरातील आपल्या दुकानाजवळ शनिवारी दुपारी उपस्थित असताना आरोपी कृष्णा संतोष चव्हाण व गुरुराज बाबुलाल चव्हाण (दोघेही रा. नवनाथनगर, पेठरोड, नाशिक) तेथे आले. सुमारे पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा राग मनात धरून आरोपींनी राहुल मोरे यांच्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. काही वेळातच वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी धारदार चॉपर काढून राहुल मोरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. आरोपींनी केलेला वार राहुल मोरे यांनी चपळाईने चुकविला. मात्र, या झटापटीत त्यांना दुखापत झाली.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, आरोपी अत्यंत आक्रमक पद्धतीने वागत होते आणि परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. या हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, पळून जातानाही त्यांच्या हातात धारदार शस्त्रेे होती.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाडस दाखवत आरोपींचा पाठलाग सुरू केला. दरम्यान, वणी पोलिस ठाण्याचे कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. नागरिक आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आरोपींचा काही अंतरापर्यंत पाठलाग करण्यात आला आणि अखेर दोघांनाही ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी वणी पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. 136/2026 दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किरण जगदाळे करीत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर दामोदरनगर परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिसरात असलेल्या मद्यविक्री दुकानांमुळे अनेक वर्षांपासून कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मद्यपींकडून वारंवार होणारी शिवीगाळ, भांडणे, मारामार्‍या, महिलांची छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, तसेच वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे जगणे असुरक्षित बनल्याची भावना व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, याच कारणांमुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत संबंधित मद्यविक्री दुकाने दामोदरनगर परिसरातून स्थलांतरित करण्याचा ठराव यापूर्वी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतरही त्याची प्रभावी अंमलबजावणी झालेली नाही. परिणामी परिसरातील नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. मद्यविक्री केंद्रांभोवती निर्माण होणार्‍या सामाजिक समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, या परिसरात अनेकदा रस्त्यावरच मद्यपींची गर्दी होत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. अनेक वेळा किरकोळ वादातून मोठ्या मारामार्‍या झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. आता थेट चॉपर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने परिस्थिती किती गंभीर बनली आहे, हे या घटनेवरून स्पष्ट होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे दामोदरनगरसह संपूर्ण वणी शहरात चर्चेला उधाण आले असून, परिसरातील नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलिस प्रशासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा भविष्यात आणखी गंभीर घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Attempted knife attack causes panic in Vani

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक दिंडोरी : प्रतिनिधी तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री…

19 hours ago

सिंहस्थाच्या नावाने त्र्यंबकेश्वरचे रस्ते गाळात

ओव्हर स्मार्ट नियोजनामुळे नागरिक अन् भाविक हैराण त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर…

19 hours ago

पावसा पावसा… तू पण!

नाशिक शहर आणि सभोवतालच्या परिसरात मागील महिन्याभरात धो..धो.. पाऊस बरसला आहे. नाशिक जिल्ह्यात जुलै महिन्यात…

19 hours ago

अब्दुल्लांचे आंदोलन

कॉक्रोच जनता पार्टीच्या ‘चलो संसद’ आंदोलनात 20 जुलै रोजी प्रचंड हंगामा झाला. विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी…

19 hours ago

जीवघेणे खड्डे !

पाच जणांचा मृत्यू; नागरिकांमध्ये प्रचंड संताप नाशिक : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर शहरात हजारो कोटी…

19 hours ago

खड्डेमुक्तीसाठी मंत्री महाजनांचा सात दिवसांचा अल्टिमेटम

अन्यथा अधिकार्‍यांवर कारवाई, ठेकेदारही रडारवर नाशिक : प्रतिनिधी वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा होत असल्याने शहरात रस्ते…

20 hours ago