सभापती शरदराव थोरात : वार्षिक सभेत विविध विकासकामांचा आढावा
सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर नगर परिषद हद्दीतील भाजीपाला वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. समितीच्या आवारातील पेट्रोलपंपालगतच्या पहिल्या मजल्यावरील 21 गाळ्यांची लिलाव प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती शरदराव थोरात यांनी दिली.
सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 27) समितीच्या मुख्य कार्यालयातील सभागृहात सभापती थोरात यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून सभेला सुरुवात झाली.
सभापती थोरात यांनी बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. पेट्रोलपंपालगतच्या पहिल्या मजल्यावरील 21 गाळ्यांचा लिलाव बाजार समितीच्या आवारातच घेण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. इच्छुकांनी समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
या सभेत बाजार समितीचे सचिव विजय विखे यांनी वार्षिक अहवालाचे, तर लेखापाल डी. जे. राजेभोसले यांनी आर्थिक पत्रकाचे वाचन केले. आर्थिक पत्रकांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.
संचालक रवींद्र शेळके यांनी मनोगत व्यक्त करताना 2023 पासून संचालक मंडळाकडे बाजार समितीची सूत्रे आल्यानंतर खासदार राजाभाऊ वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामे करण्यात आल्याचे सांगितले. मुख्य बाजार आवारातील रस्त्यांचे डांबरीकरण, लिलावासाठी वाहने उभी राहणार्या ठिकाणी खडीकरण तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या क्षमतेची टाकी उभारण्यात आल्याने शेतकरी व बाजार समितीतील विविध घटकांना सुविधा उपलब्ध झाल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संचालक सुनील चकोर यांच्यासह शेतकरी व सभासद उपस्थित होते. केशव केकाटे, प्रसाद लढ्ढा, गणेश बुचकुल, भारत पोटे, उत्तम डावरे, विकास झाडे, कैसर कुरेशी, जुबेर सय्यद, सुदाम जाधव, खंडेराव जायभाये तसेच कर्मचारीवृंद उपस्थित होते. संचालक सुनील चकोर यांनी आभार मानले.
हिवरगावला सुरू करणार कांदा लिलाव
हिवरगाव येथे गट क्रमांक 3/1 मधील सहा हेक्टर जागा समितीने शासनाकडून संपादित करून घेतली आहे. परिसरातील शेतकर्यांची गैरसोय दूर करण्यासाठी हिवरगाव येथील या नवीन जागेत लवकरच कांदा शेतमालाचे लिलाव सुरू करण्यात येणार असल्याचे संचालक रवींद्र शेळके यांनी सांगितले.
Auction for 21 vegetable market stalls at Sinnar Market Committee to be held soon.