बडगुजरांच्या खेळीने आ. सीमा हिरेंना शह

समर्थकांचे पत्ते कापल्याने हिरेंना मोठा धक्का

नाशिक : प्रतिनिधी
भाजपकडून उमेदवारी मिळावी, याकरिता तब्बल बाराशे इच्छुकांनी मुलाखत दिली होती. मात्र, उमेदवाराच्या मेरिटनुसार त्याची निवड करण्यात आली. यात भाजपने अनेक दिग्गजांना डच्चू देत धक्कातंत्राचा वापर केला. दरम्यान, सिडकोमध्ये तिकिटावरून जबरदस्त घडामोडी घडल्या. ठाकरे गटातून भाजपात गेलेले सुधाकर बडगुजरांच्या घरात थेट तीन उमेदवार्‍या दिल्या गेल्या. तर एका समर्थकाच्या पत्नीलाही उमेेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी झाले. मात्र, या सर्व घडामोडीत बडगुजर यांनी पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांना शह दिल्याची जोरदार चर्चा होते आहे.
महापालिका निवडणुकीमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या सुधाकर बडगुजर यांची खेळी सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत
आली आहे.
विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या समर्थकांना डावलत सुधाकर बडगुजर यांच्या घरात तीन उमेदवार्‍या दिल्याने पक्षातील अंतर्गत वाद चर्चेत आला आहे. सुधाकर बडगुजर, मुलगा दीपक बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर यांना त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत भाजपने एबी फॉर्म दिला. हर्षा बडगुजर यांच्या जागेवर आमदार सीमा हिरे समर्थक भाग्यश्री ढोमसे यांनाही पक्षाने एबी फॉर्म दिला होता. मात्र, हर्षा बडगुजर यांचा उमेदवारी अर्ज अगोदर आल्याने तो वैध ठरवण्यात आला. दरम्यान, भाग्यश्री ढोमसे, मुकेश शहाणे, संगीता पाटील, पुष्पा पवार या आ. हिरे समर्थकांचे पत्ते कापत मोठा धक्का दिला. गेेल्या आठ वर्षांपासून महापालिका निवडणुकांच्या प्रतीक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांसह सर्वांचीच धाकधूक वाढली होती. भाजपने निवडून येण्याची क्षमता पाहून आणि निवडणूक सर्व्हेच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलल्याचं दिसून आलं. निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना संधी दिली. पक्ष कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. दरम्यान, काहींनी पक्षांतरे केली तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल 23 आयारामांना उमेदवारी दिली आहे.

….तर ही परिस्थिती उद्भवली नसती

या प्रकारात माझा कुठलाही संबंध नाही. आपल्याविरोधात चुकीचा नरेटिव्ह पसरवला जातो आहे. कोअर कमिटीची बैठक झाली, त्यात कुठल्या प्रभागात एबी फॉर्म द्यायचे हे ठरवण्यात आले होते. मात्र, त्यानुसार निर्णय न झाल्याने हा गोंधळ झाला. आपल्याला चार एबी फॉर्म दिले होते. त्यानुसार ठरलेल्या जागांवर आपण एबी फॉर्म दिले. मात्र, आपण दिलेल्या जागांवर पुन्हा तेथे एबी फॉर्म दिले गेले. त्यामुळे ही चूक माझी नाही. पक्षाचा आदेश आपल्यासाठी सर्वकाही राहील. पक्ष सांगेल एका ठिकाणाहून उमेदवाराची माघार घेऊ. आपण दोन जागा मागितल्या होत्या. अपघाताने ही परिस्थिती उद्भवली.
– सुधाकर बडगुजर, भाजप नेते

Badgujar’s play gives a boost to the A.S. Seema Hiran

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *