सप्तशृंग निवासिनी देवीचे दर्शन भाविकांना 24 तास मिळणार

वणी : प्रतिनिधी
शाकंबरी पौर्णिमा, नाताळच्या सुट्ट्या तसेच नूतन वर्ष आरंभ या कालावधीत आलेल्या सुट्ट्या यामुळे पर्यटनस्थळांवरील गर्दीत मोठी वाढ झालेली आहे. भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता तेथील प्रशासनाने मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेतला असून, 4 जानेवारीपर्यंत भाविकांना सप्तशृंगीदेवीचे मंदिर दर्शनासाठी 24 तास खुले असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. पुढील चार दिवस भाविकांची गडावर मोठी गर्दी असणार आहे. त्यात रविवारपासून आदिमायेचा सुरू असलेला शाकंबरी नवरात्रोत्सव, दि. 1 ते 3 जानेवारीपर्यंत शाकंबरी नवरात्रोत्सवानिमित्त ट्रस्टच्या वतीने आयोजित राधा-कृष्ण महायाग, शनिवार(दि. 3)ची शाकंबरी पौर्णिमा उत्सव व रविवार, दि. 4 रोजी धनुर्मासातील तिसरा रविवारचा किरणोत्सव यामुळे संपूर्ण दिवस धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असणार असल्याने या कालावधीत गडावर भाविकांची मोठी गर्दी उसळणार आहे. पर्यायी होणार्‍या संभाव्य गर्दीच्या अनुषंगाने गर्दीचे व्यवस्थापन व भाविक भक्तांना समाधानकारक दर्शन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने येणार्‍या भाविकांची गर्दी विभागली जावी आणि सर्वांना सहजतेने श्री भगवती दर्शन घेता यावे यासाठी नूतन वर्ष प्रारंभास विविध राज्यांतून येणार्‍या भाविकभक्तांंसाठी श्री भगवती मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *