शासनाचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप
सटाणा : तालुका प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊनही बागलाण तालुक्यात अद्याप पंचनाम्यांना सुरुवात झाली नाही. महसूल प्रशासनाकडून शासनाचे आदेश धाब्यावर बसविले जात असल्याचा आरोप करीत, तालुक्यात सरसकट पीक पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा, या मागणीसाठी बागलाणचे माजी आमदार संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे बागलाणचे तहसीलदार कैलास चावडे यांना घेराव घालून आंदोलन
करण्यात आले.
‘राशप’तर्फे महसूल प्रशासन तसेच शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत तहसील आवारात अचानक आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदारांना घेराव घालण्यात आला. यावेळी बोलताना माजी आमदार चव्हाण यांनी बोलताना, बागलाण तालुक्यात संपूर्ण पावसाळ्यात आतापर्यंत केवळ सुमारे चार ते पाच दिवस पाऊस पडला असून, पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने पिकांची वाढ खुंटल्याचे स्पष्ट करीत, कांदा, मका यांसह डाळिंब, द्राक्षे, सीताफळ, पेरू आणि ऊस या पिकांनाही मोठा फटका बसल्याचे सांगितले. उत्पादन घटण्याची भीती निर्माण झाल्याने शेतकर्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले असून, शेतीवर अवलंबून असलेले मजूर, छोटे-मोठे व्यावसायिकही आर्थिक संकटात सापडले आहेत.
यावेळी केशव मांडवडे, संजय पवार, भारत काटके, छोटू सोनवणे, साहेबराव सोनवणे, अमित सोनवणे, दादू सोनवणे, पोपटराव सोनवणे, राजेंद्र जाधव, विनोद पाटील, मयूर अहिरे, विलास सोनवणे, किरण शिंदे, सागर मोरे, स्वप्नील सोनवणे, पोपटराव सोनवणे, विकी महाजन, पोपटराव अहिरे, सुभाष पाटील, काळु जाधव, दीपक रौंदळ, केदार सोनवणे, राजेंद्र सोनवणे, आनंदा सोनवणे आदींसह पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. संकटग्रस्त शेतकर्यांना पीकविमा योजनेची रक्कम तातडीने वितरित करावी, पिकांचे सरसकट पंचनामे करून शासनाला तत्काळ अहवाल पाठवावा तसेच बागलाणमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेऊन त्याअंतर्गत मिळणारे सर्व लाभ शेतकर्यांना द्यावेत, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Baglan Tehsildars surrounded by ‘Rashap’