घराला बाहेरून कडी लावून स्कॉर्पिओ घेऊन पसार!

तरुणीसह चौघांचा चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद; पांगरीत माजी पं. स. सदस्य यांचे वाहन चोरीला

सिन्नर : प्रतिनिधी
घरात पगार कुटुंबीय झोपेत असतानाच बाहेरून सुरक्षा गेटला कडी लावून तरुणीसह चौघांनी स्कॉर्पिओ लंपास केली. विशेष म्हणजे, घराला कडी लावण्यापासून वाहन घेऊन पसार होईपर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम अवघ्या 13 मिनिटांत घडला. चोरीचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून, पांगरी येथे बुधवारी (दि. 16) मध्यरात्री घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे.
सिन्नर-शिर्डी महामार्गालगत पांगरी येथे माजी पंचायत समिती सदस्य तथा व्यावसायिक रवींद्र पगार यांचा बंगला आहे. मंगळवारी रात्री त्यांनी स्कॉर्पिओ (एमएच 15 जीझेड 0487) घराशेजारील मोकळ्या जागेत उभी केली होती. मध्यरात्री 1.38 वाजता गावातील श्रेयस बंडू पगार यांनी रवींद्र पगार यांना फोन केला. ‘इतक्या वेगाने स्कॉर्पिओ घेऊन सिन्नरकडे का जात आहात?’ अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर पगार यांनी आपण घरातच झोपलो असल्याचे सांगितले. त्यावेळी श्रेयस यांनी स्कॉर्पिओसोबत एक स्विफ्ट कारही वेगाने गेल्याचे सांगितले.
यामुळे पगार यांनी तातडीने खाली येऊन पाहिले असता घराचे सुरक्षा गेट बाहेरून कडी लावून बंद केल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ 112 क्रमांकावर पोलिसांना माहिती दिली. वावी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भास्कर शिंदे गस्तीवर असतानाच घटनास्थळी पोहोचले आणि घराची कडी उघडली. त्यानंतर शिर्डी-सिन्नर महामार्गावर नाकाबंदी करण्यात आली. पहाटे तीन वाजेपर्यंत पोलिसांनी परिसरात शोध घेतला; मात्र चोरट्यांचा मागमूस लागला नाही. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

चार वर्षांपूर्वीही स्कॉर्पिओ चोरण्याचा प्रयत्न

याच स्कॉर्पिओची चोरी करण्याचा प्रयत्न चार वर्षांपूर्वीही झाला होता. त्यावेळी चोरट्यांनी लॅपटॉपच्या सहाय्याने वाहनाची सेन्सर यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आवाज झाल्याने पगार खाली आले आणि फावड्याच्या दांड्याने प्रतिकार केल्याने चोरट्यांचा प्रयत्न फसला होता. यावेळी मात्र चोरटे स्कॉर्पिओ पळवून नेण्यात यशस्वी झाले.

घटना सीसीटीव्हीत कैद

परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोरीचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला. स्विफ्ट कारमधून एका तरुणीसह चौघे पगार यांच्या घराजवळ आले. त्यांनी घराच्या सुरक्षा गेटला बाहेरून कडी लावली आणि स्कॉर्पिओ घेऊन पसार झाले. अवघ्या 13 मिनिटांत स्कॉर्पिओ लंपास केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. पगार यांच्या बंगल्यासमोर सिन्नर-शिर्डी महामार्गावरील उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलावरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने परिसरात रात्री अंधार असतो. याच अंधाराचा फायदा चोरट्यांनी घेतल्याचा संशय आहे. पगार हे बंगल्याच्या वरच्या मजल्यावर राहतात.

 

Bolted the house from the outside and fled in a Scorpio!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *