मांजाचा वापर केल्यास कडक कारवाईचा मुख्याधिकार्यांचा इशारा
येवला : प्रतिनिधी
पुढील जानेवारी महिन्यात मकरसंक्रांत आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविण्यासाठी शहरात काही दुकानदारांकडून नायलॉन मांजा छुप्या पद्धतीने विक्री करण्यात येत आहे. सदर नायलॉन मांजावर बंदी असताना कोणत्याही विक्रेत्याने सदर मांजाची विक्री केल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा येवला नगरपालिकेचे
मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.
मुख्याधिकारी आहेर यांनी म्हटले आहे की, येवला शहरात नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, नायलॉन मांजामुळे नागरिक, बालक, दुचाकीस्वार, पक्षी तसेच जनावरांच्या जीविताला मोठा धोका निर्माण होत असून, अनेक अपघात व गंभीर दुखापतींच्या घटना समोर येत आहेत. हा धोका लक्षात घेता नायलॉन मांजाचा वापर पूर्णतः बंद करणे आवश्यक आहे. नायलॉन मांजा हा कायद्याने बंदी घालण्यात आलेला असून, त्याची विक्री, साठवणूक तसेच वापर करणे हा गुन्हा आहे. तरीही काही ठिकाणी बेकायदेशीररीत्या या मांजाची विक्री होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वारांच्या गळ्याला गंभीर जखमा झाल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. तसेच, हा मांजा घातक असल्याने पक्ष्यांचे पंख कापले जाणे, त्यांचा मृत्यू होणे अशा हृदयद्रावक घटना सातत्याने घडत आहेत. येवला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व नागरिक, दुकानदार, पतंग विक्रेते व पालक यांनी याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे. नायलॉन मांजाऐवजी केवळ सुताचा मांजा वापरण्याचे निर्देश देण्यात आले असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
शहरात नायलॉन मांजाची विक्री करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असून, संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही मुख्याधिकारी आहेर यांनी दिला आहे. दरम्यान, नगरपरिषद, पोलीस प्रशासन व संबंधित विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे येवला शहरात तपासणी मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहितीही पत्रकात मुख्याधिकारी आहेर यांनी दिली आहे.
शहरातील नागरिकांनी स्वतःची तसेच इतरांची सुरक्षितता लक्षात घेऊन नायलॉन मांजाचा वापर टाळावा, प्रशासनास सहकार्य करावे व कोणत्याही ठिकाणी नायलॉन मांजाची विक्री होत असल्याचे आढळल्यास तत्काळ नगरपरिषद किंवा पोलीस प्रशासनाला कळवावे.
-तुषार आहेर, मुख्याधिकारी, नगरपरिषद, येवला
राज्यभरात शिक्षकांचे आंदोलन; अधिवेशनात धरणे आंदोलनाचा इशारा पुणे : टीईटी परीक्षेच्या विरोधात शुक्रवारी (दि. 5)…
नाशिक गारठले : गेल्या चार-पाच दिवसांपासून तापमानात घट होत असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोटीचा…
चार महिन्यांत सातशे कोटी वसुलीचे मनपाला आव्हान नाशिक : प्रतिनिधी शहरातील करदात्यांकडील थकबाकीचा आकडा तब्बल…
भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न; प्रतीकात्मक करवत, कुर्हाड जाळून निषेध नाशिक : प्रतिनिधी तपोवनातील वृक्षतोडीवरून महायुतीतच…
घोटी-त्र्यंबकेश्वर वाढीव रस्त्याचा प्रश्न; पोलिसांनी शेतकर्यांना घेतले ताब्यात घोटी : प्रतिनिधी इगतपुरी तालुक्यातील घोटी- त्र्यंबकेश्वर…
मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. जो कधी चुकतच नाही तो माणूसच नाही, असे म्हटले तर…