एन. डी. पटेल रोडवरील विभागीय कार्यालयात दुर्गंधी
♦ स्वच्छतागृहात स्वच्छतेचा अभाव
♦ मुक्कामी येणार्या वाहक, चालकांची गैरसोय
♦ विभागीय कार्यालयात दुर्गंधीयुक्त वातावरण
♦ कर्मचार्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
नाशिक : प्रतिनिधी
राज्यभरातील बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे 1 जूनपासून प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे. प्रवाशांसाठी आनंदाची बाब असली तरी ज्या एन. डी. पटेल रोडवरील नाशिक विभाग एसटीच्या कार्यालयात सर्व कारभार चालतो, तेथील स्वच्छतागृहे अतिशय दुर्गंधीयुक्त असून, कर्मचारी त्याच वातावरणात काम करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधितांकडे तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे येथील कर्मचार्यांनी सांगितले. कंत्राटी कामगार नेमले आहे, असे सांगितले जाते; परंतु पुन्हा परिस्थिती जैसे थेच असल्याचे चित्र आहे. एन. डी. पटेल रोड येथील विभागीय कार्यालयात प्रवेश करतानाच नाकाला रुमाल लावूनच जावे लागते. प्रवेश करताक्षणी जवळच्या स्वच्छतागृहातून येणार्या दुर्गंधीमुळे वातावरण दूषित होत असून, काही कामानिमित्त आलेल्या अभ्यागतांना त्यांचे काम होईपर्यंत त्रास सहन करावा लागतो; परंतु तेथे काम करणारे महिला, पुरुष कर्मचार्यांना त्या दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत आहे. विशेष म्हणजे, येथील कार्यालयही स्क्रॅप बसेससारखे तुटलेले, तुटक्या खुर्च्या, टेबल, अस्ताव्यस्त सामान, कागदपत्र असे असून, एखाद्या गोडावूनमध्ये आल्याचा भास होतो.
स्वच्छतागृहे मोफत होणे यांसह नियमित स्वच्छ आणि देखभालीखाली राहणे आवश्यक आहे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर 4 मार्च रोजी गोर्हेंच्या अध्यक्षतेखाली या मुद्यावर चर्चा झाली होती. या बैठकीनंतर परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णय घेत तिकिटावर दोन रुपये अधिभार घेत ही स्वच्छतागृहे कंत्राटदाराकडून काढून घेत महामंडळातर्फे चालविण्याची घोषणा केली होती. परंतु, दिव्याखालीच अंधार असे चित्र सध्या एन. डी. पटेल रोड येथील एसटीच्या विभागीय कार्यालयात दिसून
येत आहे.
आगारनिहाय नियोजन करताना जिथे महामंडळाचे स्वच्छता कर्मचारी नाहीत तेथे स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार कंत्राटी स्वच्छता कर्मचारी नेमून स्वच्छता करून घ्यावी. गरज पडल्यास निविदा प्रक्रिया राबवून विभागीय स्तरावर स्वच्छता संस्था नेमण्यात यावी आदींवर चर्चा करून स्वच्छतेसाठी बसेस, बसस्थानक व परिसर, प्रसाधनगृहे स्वच्छ करण्याची जबाबदारी एसटीच्या स्वच्छतेसाठी नेमलेल्या कर्मचार्यांची असली तरी स्वच्छता राखण्यासाठी वापरकर्त्या प्रवाशांसाठी जनजागृतीसाठी स्वच्छतादूत नेमून प्रवाशांचे प्रबोधन करून त्यांचा सहभाग नोंदविण्यासाठी प्रयत्न केला जाणार होता. या चर्चेचे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती विभागाकडून देण्यात आली तर नाहीच, परंतु एन. डी. पटेल रोडवरील नाशिक विभागाचे कार्यालयातीलच स्वच्छतागृहे अतिशय दुरवस्थेत असून, दुर्गंधीयुक्त वातावरणात तेथील कर्मचारी काम करीत आहेत.
महिला कर्मचार्यांची कुचंबणा
कर्मचार्यांना अतिशय दुर्गंधीयुक्त वातावरणात काम करावे लागत असून, महिला कर्मचार्यांची कुचंबणा होत आहे. तसेच येथील स्वच्छतागृहांच्या परिसरात झाडांचा पालापाचोळा आणि इतर कचरा पडल्याने साप वा इतर प्राण्यांचा वावर असण्याची शक्यता असून, येथील कर्मचार्यांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. याबाबत 3 मे 2022 ला दैनिक गांवकरीमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर 20 जानेवारी 2025 मध्ये प्रवाशांना सुरक्षित प्रवासासोबत प्रसन्न वातावरण देण्याच्या उद्देशाने एसटी महामंडळाने रस्त्यावर धावणारी प्रत्येक बस स्वच्छ असेल, बसस्थानक व परिसर स्वच्छ व टापटीप असेल, याबरोबरच प्रत्येक बसस्थानकावरील प्रसाधनगृहेही स्वच्छ व निर्जंतुक असतील, यावर भर दिला जाणार होता. यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत निर्देश दिले होते.
Before going to the ST office, cover your nose with a handkerchief!