नांदगावला आधारवड सेवाभावी संस्थेच्या बैठकीत निर्णय
नांदगाव : प्रतिनिधी
येथील आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची बैठक संस्थापक अध्यक्षा संगीता सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. बैठकीत जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम झाला. आगामी काळात शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी तीव्र लढा उभारण्याचा निर्धार केला. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर येत्या 5 एप्रिलला भीक मांगो आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीत शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांना होणार्या अडचणीँसंदर्भात चर्चा केली. राज्य सरकारने शासकीय आश्वासनाची पायमल्ली केली आहे. एक हजार रुपयांच्या वाढीची अंमलबजावणी रखडली आहे. यामुळे या बैठकीत महिलांनी सरकारप्रति तीव्र संताप व्यक्त केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी शालेय पोषण आहार शिजवणार्या महिलांच्या मानधनात एक हजार रुपयांची वाढ जाहीर केली होती. मात्र, विद्यमान सरकारने अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. महिलांना त्यांच्या हक्काच्या मानधनापासून वंचित ठेवल्याने प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण झाला आहे. बैठकीला सचिव आशाबाई काकळीज, मनीषा भाबड, शैला भाबड, सुमित्रा शिंदे, सरला मोढे, कविता मोरे, मंगल देसले, संगीता गुंजाळ, कुसुम मगर, सरूबाई दळवी यांच्यासह आधारवड संस्थेच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव येथील कार्यालयावर येत्या 5 एप्रिलला भीक मांगो आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या हक्कासाठी महिलांना रस्त्यावर उतरून शासनाचे लक्ष वेधून घ्यावे लागणार आहे आणि जमा झालेले पैसे आम्ही सरकारला मनिऑर्डर करू.
– संगीता सोनवणे, अध्यक्षा, आधारवड सेवाभावी संस्था, नांदगाव
Begging protest at Minister Bhuse’s office on April 5