– वाहिद बागवान
रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस आहे, कोणाची पक्षात नियुक्ती झाली किंवा कोणाच्या स्वागताची तयारी सुरू आहे, हेच अधिक ठळकपणे दिसू लागले आहे. वाहनचालकांना दिशा दाखवणारे फलक राजकीय नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रसिद्धीचे हक्काचे अड्डे बनले आहेत. नागरिकांच्या करातून उभारलेल्या या सार्वजनिक सुविधांवर राजकीय जाहिरातबाजीने अक्षरशः कब्जा केला आहे. विशेष म्हणजे, काही कमानी गंजलेल्या, वाकलेल्या आणि धोकादायक अवस्थेत असतानाही प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. दिशादर्शकांवरील राजकीय अतिक्रमण, कमानींची दुरवस्था आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबरोबरच सार्वजनिक मालमत्तेच्या संरक्षणाचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरातील प्रमुख रस्ते, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे आणि महामार्गांची माहिती देण्यासाठी सार्वजनिक निधीतून या कमानी उभारण्यात आल्या. मात्र, नेत्यांचे वाढदिवस, पक्षातील नियुक्त्या, स्वागतसमारंभ किंवा राजकीय दौरे म्हटले की, या कमानींवर रातोरात फ्लेक्स झळकतात. कोणत्या रस्त्याने जायचे, हे सांगणार्या फलकांवर आता कोणत्या नेत्याला शुभेच्छा द्यायच्या, याचीच माहिती अधिक ठळक दिसते. सार्वजनिक मालमत्तेचा हा सरळसरळ गैरवापर आहे. करदात्यांच्या पैशातून उभारलेली व्यवस्था राजकीय प्रसिद्धीसाठी आंदण दिलेली नाही, याचे भान संबंधितांना राहिलेले दिसत नाही.
या अतिक्रमणाचा प्रश्न केवळ शहराच्या विद्रूपीकरणापुरता मर्यादित नाही; तो वाहतूक सुरक्षेशीही जोडलेला आहे. बाहेरगावाहून आलेल्या वाहनचालकाला चौकात पोहोचल्यावर दिशादर्शकाऐवजी एखाद्या ‘भाऊ’, ‘दादा’ किंवा ‘साहेबां’चा चेहरा दिसत असेल, तर मार्ग कसा शोधायचा? फलक न दिसल्याने वाहन अचानक थांबवणे, वेग कमी करणे किंवा चुकीच्या दिशेने वळणे अशा प्रकारांतून अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो.
दुसरीकडे, अनेक दिशादर्शक कमानींची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. लोखंडी सांगाडे गंजले आहेत, काही फलक वाकलेले किंवा तुटलेल्या अवस्थेत आहेत. त्यावर लटकणार्या फ्लेक्समुळे अतिरिक्त भार पडतो.
वादळी वारा किंवा पावसात अशा कमानी धोकादायक ठरू शकतात. दुर्घटना घडल्यानंतर चौकशी समिती नेमण्यापेक्षा प्रशासनाने आताच सर्व कमानींचे संरचनात्मक परीक्षण करून आवश्यक दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
मात्र, याहून गंभीर प्रश्न प्रशासनाच्या भूमिकेचा आहे. बेकायदेशीर फलकांवर कारवाई करण्याचे अधिकार असताना त्यांचा प्रभावी वापर का होत नाही? राजकीय दबावामुळे कारवाई टाळली जाते की प्रशासकीय इच्छाशक्तीच कमी पडते? सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी कायदेशीर तरतुदी आहेत. न्यायालयांनीही अनधिकृत होर्डिंग्जविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. तरीही शहरातील परिस्थितीत अपेक्षित बदल दिसत नाही.
अलीकडे कारवाईपेक्षा तिच्या प्रसिद्धीलाच अधिक महत्त्व दिले जात असल्याचे चित्र आहे. एखाद्या चौकातील चार फलक उतरवायचे, त्याचे चित्रीकरण करायचे आणि समाजमाध्यमांवर कारवाईचा गाजावाजा करायचा, पण काही दिवसांत त्याच जागी पुन्हा बॅनर झळकतात. अशा दिखाऊ मोहिमांमुळे प्रश्न सुटत नाही. प्रशासनाची कार्यक्षमता ‘रील’मधून नव्हे, तर रस्त्यांवरील कायमस्वरूपी शिस्तीतून दिसली पाहिजे.
नाशिककरांकडून मालमत्ता कर आणि विविध शुल्कांची वसुली करताना प्रशासन तत्पर असते. मग त्याच नागरिकांच्या पैशातून उभारलेल्या सुविधांचे संरक्षण करताना तत्परता का दिसत नाही? करवसुलीसाठी कठोर भूमिका घेणार्या व्यवस्थेने सार्वजनिक मालमत्तेवरील राजकीय अतिक्रमणाबाबतही तितकीच कठोरता दाखवायला हवी.
सर्व अनधिकृत फलक तातडीने हटवणे, संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे, कमानींची दुरुस्ती आणि नियमित देखभाल करणे, तसेच पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे. ही कारवाई पक्ष किंवा व्यक्ती पाहून नव्हे, तर समान निकषांवर झाली पाहिजे.
दिशादर्शक कमानी नागरिकांना दिशा दाखवण्यासाठी आहेत, नेत्यांची राजकीय उंची दाखवण्यासाठी नव्हेत. प्रशासनाने या कमानी राजकीय विळख्यातून मुक्त कराव्यात. कारण हा प्रश्न केवळ शहराच्या सौंदर्याचा नाही, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि सार्वजनिक संपत्तीवरील त्यांच्या हक्काचा आहे!
‘Bhau-Dada’ hold a monopoly over signboards!
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- ज्योती काळे-जाधव अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
गेल्या काही दिवसापासून अत्यंत नावाजलेल्या अशा खाद्यपदार्थांच्या दुकानांचं नाव समोर आले, का तर म्हणे ’एफडीए’च्या…