– ज्योती काळे-जाधव
अलीकडच्या काळात घडणार्या आत्महत्यांच्या घटना मनाला अस्वस्थ करून जातात. पुण्याची पायल, काल आरटीओ अधिकारी यांच्या आत्महत्या नी समाजमन पुन्हा एकदा ढवळून निघाले. रोजच्या बातम्यांमध्ये कुठे एखाद्या विद्यार्थ्याने, कुठे तरुणाने, कुठे कुटुंबातील व्यक्तीने मानसिक संघर्षातून टोकाचं पाऊल उचलल्याची बातमी वाचायला मिळते. काही क्षण आपण त्या घटनेबद्दल हळहळ व्यक्त करतो, सोशल मीडियावर दुःख व्यक्त होतं, चर्चाही होतात; पण त्यानंतर पुन्हा रोजचं आयुष्य सुरू होतं. मात्र, त्या एका घटनेने उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होऊ शकतं का? मागे राहिलेल्या माणसांच्या मनात निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार? असे अनेक प्रश्न मनात घर करतात.
आयुष्य खरंच इतकं कठीण आहे का? की काही वेळा परिस्थिती, अपेक्षा, अपयश आणि मनातील न बोललेल्या वेदना माणसाला जगण्यापासून दूर नेतात? प्रत्येक माणूस बाहेरून दिसतो तसा आतून असतोच असं नाही. कुणाच्या चेहर्यावर हसू असतं, पण मनात अनेक प्रश्न असतात. कुणी रोज कामावर जात असतं, घरातील जबाबदार्या पार पाडत असतं, इतरांना धीर देत असतं; पण स्वतःच्या मनात चाललेल्या संघर्षाबद्दल मात्र कुणाशीही बोलत नसतं. मनातील वेदना नेहमी शब्दांत व्यक्त होतीलच असं नाही. काही दुःख शांततेतही लपलेली असतात. आज माणसाच्या आयुष्याभोवती अपेक्षांचं एक मोठं वर्तुळ निर्माण झालं आहे. चांगले गुण मिळवायचे, मोठं करिअर घडवायचं, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हायचं, घरच्यांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या, समाजात स्वतःची ओळख निर्माण करायची… या सगळ्यांच्या धावपळीत मनाला शांतता मिळतेय का, याचा विचार करण्यासाठीही वेळ उरत नाही. एखाद्या परीक्षेत अपयश आलं, नोकरी मिळाली नाही, आर्थिक संकट आलं, नात्यात दुरावा निर्माण झाला किंवा आयुष्य मनासारखं घडलं नाही, तर त्या क्षणी माणसाला संपूर्ण आयुष्यच निराशाजनक वाटू शकतं. मात्र, एका अपयशाने संपूर्ण आयुष्याचं मूल्य ठरत नाही. एका दिवसातील अंधार म्हणजे संपूर्ण आयुष्य अंधारमय आहे, असंही नाही. विशेषतः तरुण पिढी आज अनेक मानसिक आव्हानांना सामोरी जात आहे. स्पर्धेचं जग, शिक्षणाचा ताण, करिअरची अनिश्चितता, नोकरीचा प्रश्न, नात्यांमधील गुंतागुंत आणि सोशल मीडियावर दिसणार्या इतरांच्या यशाशी स्वतःची तुलना… या सगळ्यांचा मनावर परिणाम होत असतो. दुसर्याचं आयुष्य सुंदर दिसतं म्हणून आपलं आयुष्य कमी सुंदर ठरत नाही. प्रत्येकाची वाट वेगळी असते, प्रत्येकाच्या संघर्षाची वेळ वेगळी असते आणि प्रत्येकाच्या यशाचं मोजमापही वेगळं असायला हवं. आयुष्य ही कोणती स्पर्धा नाही, ज्यामध्ये ठरावीक वेळेत ठरावीक यश मिळवायलाच हवं.
कधी आर्थिक अडचणी माणसाला हतबल करतात, कधी कौटुंबिक परिस्थिती मनाला थकवते, तर कधी आपल्या जवळच्या माणसांकडून अपेक्षित आधार मिळत नाही. काही वेदना अशा असतात की त्या समजावून सांगणंही कठीण वाटतं. अशा वेळी माणसाला मोठमोठे सल्ले नको असतात; त्याला फक्त कुणीतरी शांतपणे ऐकून घ्यावं, त्याच्या मनातील भावना समजून घ्याव्यात आणि आपण एकटे नाही, याची जाणीव करून द्यावी, एवढंच कदाचित पुरेसं ठरतं. प्रत्येक दुःखावर लगेच उत्तर मिळेलच असं नाही, पण दुःखाच्या काळात माणसाची साथ मिळणं हीदेखील मोठी ताकद असते. आत्महत्येचा विचार मनात येणार्या व्यक्तीकडे कमकुवतपणाच्या नजरेने पाहणं चुकीचं आहे. मानसिक वेदना या दिसणार्या जखमांसारख्या नसतात. त्या सहज दिसत नाहीत, पण मनाला खोलवर त्रास देऊ शकतात. अशा व्यक्तीला दोष देण्याऐवजी तिच्या मनातील वेदना समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा. संवाद, विश्वास, कुटुंबाची साथ आणि गरज पडल्यास तज्ज्ञांची मदत या गोष्टी त्या व्यक्तीला संकटातून बाहेर पडण्यासाठी आधार देऊ शकतात. आपण अनेकदा आयुष्याच्या छोट्या छोट्या आनंदांकडे दुर्लक्ष करतो. उद्याच्या चिंतेत आजचा क्षण हरवतो. एखाद्या झाडाला नव्याने आलेली पालवी, सकाळचा सूर्य, घरातील माणसांचं हसू, मित्राचा फोन, मुलांच्या चेहर्यावरचा आनंद, आपल्या आवडीचं एखादं काम… या साध्या गोष्टी आयुष्याला अर्थ देत असतात. आयुष्य नेहमी मोठ्या यशातच सुंदर असतं असं नाही; कधी छोट्या आनंदांतही जगण्याची उमेद दडलेली असते. ज्या गोष्टी आज साध्या वाटतात, त्याच उद्या आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर आठवणी बनू शकतात. आयुष्य एकदाच मिळतं. ते नेहमी आपल्या मनासारखं असेलच असं नाही, पण त्यात बदल घडण्याची शक्यता कायम असते. आज जे स्वप्न अपूर्ण आहे, ते उद्या पूर्ण होऊ शकतं. म्हणून काही क्षणांच्या वेदनेत संपूर्ण आयुष्याचा निर्णय घेऊ नये. स्वतःला वेळ द्यावा, मदत मागावी, मन मोकळं करावं आणि जगण्याची आणखी एक संधी स्वतःला द्यावी. आयुष्य संपवण्याचा विचार हा समस्येवरचा उपाय नाही. समस्यांना सामोरं जाण्यासाठी मदतीचे मार्ग आहेत, माणसं आहेत, समुपदेशन आहे, उपचार आहेत आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बदलण्याची शक्यता असलेलं उद्याचं आयुष्य आहे. प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे, प्रत्येक माणसाच्या जगण्याला अर्थ आहे आणि प्रत्येकाला पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळायला हवी. कारण आयुष्य हे केवळ दुःख सहन करण्यासाठी नाही, तर आनंद अनुभवण्यासाठी, स्वप्नं पाहण्यासाठी, नाती जपण्यासाठी, स्वतःला शोधण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा बहरण्यासाठी आहे. कितीही संकटं आली, कितीही अडचणी निर्माण झाल्या तरी जगण्याची वाट बंद झाली आहे असं समजू नये. कधी फक्त एक पाऊल मागे घेऊन, स्वतःला थोडा वेळ देऊन आणि मदतीचा हात स्वीकारूनही नव्या वाटेची सुरुवात होऊ शकते. आत्महत्या हा पर्याय नाही; आयुष्याला अजूनही अनेक वाटा आहेत… आणि त्या वाटांवर अजून खूप काही सुंदर घडायचं बाकी आहे. काय कुणास ठाऊक कदाचित याहून अधिक सुंदर क्षण आपली वाट बघत असेल…
Suicide is not the solution…
यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः। यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः॥ भावार्थ : जिथे स्त्रीचा…
- मनीषा चौधरी चित्रपटसृष्टीत सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे, नितेश तिवारी दिग्दर्शित आणि…
- डॉ. किशोर पवार मानवी शरीरासाठी जीवनसत्त्वाचे महत्त्व किती अनन्यसाधारण आहे याची कल्पना सर्वांनाच आहे.…
- प्रणाली देशमुख तसा खूप मोठा परिवार आहे यांचा! पिढ्यान्पिढ्या आपल्याला अगदी मनपसंद, चमचमीत, तिखट-गोड…
- वाहिद बागवान रस्ता कुठे जातो, हे सांगण्यासाठी उभारलेल्या दिशादर्शक कमानींवर आता कोणत्या नेत्याचा वाढदिवस…
गेल्या काही दिवसापासून अत्यंत नावाजलेल्या अशा खाद्यपदार्थांच्या दुकानांचं नाव समोर आले, का तर म्हणे ’एफडीए’च्या…