बिर्‍हाड आंदोलन अखेर स्थगित

9 डिसेंबरला नागपूर अधिवेशनात निर्णायक चर्चा

नाशिक ः प्रतिनिधी
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले बिर्‍हाड आंदोलन काल आदिवासी विकास मंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या तीन महिन्यांपासून आदिवासी विकास भवनासमोर हे आंदोलन सुरू होते. वेळोवेळी हे आंदोलन मागे घेण्यासाठी चर्चा करण्यात आली. मात्र, आंदोलक ठाम होते. अखेर बिर्‍हाड आंदोलनकर्त्यांच्या विविध मागण्यांवर काल दुपारी दोनच्या सुमारास आदिवासी विकासमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. काही मुद्द्यांवर तत्काळ तोडगा निघाल्याची माहिती देत उर्वरित तांत्रिक बाबींवर 9 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात नागपुरात सखोल चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी आंदोलनकर्त्यांना दिले. या पार्श्वभूमीवर आजचे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य रोजंदारी संघटनेचे अध्यक्ष ललित चौधरी यांनी नाशिककरांची माफी मागितली. गेल्या पाच महिन्यांपासून आमचे आंदोलन सुरू होते. आमच्यामुळे शहरातील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला, नागरिकांना गैरसोय झाली, त्याबद्दल मी सर्व नाशिककरांची क्षमा मागतो. एवढ्या दिवस आम्हाला संयमाने सांभाळून घेतल्याबद्दल मी आपला मनःपूर्वक आभारी आहे, असे चौधरी यांनी म्हटले आहे. आंदोलन स्थगित झाल्यानंतर शहरातील वाहतूक पूर्ववत होण्यास मदत होणार असून, 9 डिसेंबरच्या चर्चेत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *