जिल्ह्यातील तरुणांनी सैन्यदलात भरती व्हावे : जिल्हाधिकारी

सशस्त्र सेना ध्वजदिन कार्यक्रमाचा शुभारंभ

नाशिक : प्रतिनिधी
संरक्षण दलातील सेवा ही गौरवशाली सेवा आहे. या सेवेत जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे सशस्त्र सेना ध्वजदिन 2025 चा शुभारंभ कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काल दुपारी आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस उपअधीक्षक हरीश खेडकर, शिक्षणाधिकारी सरोज जगताप (प्राथमिक), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट. कर्नल विलासराव सोनवणे आदी उपस्थित होते.
प्रारंभी शहीद सैनिकांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी वीरपत्नी रेखा खैरनार, हर्षदा खैरनार, कमल लहाने, यशोदा गोसावी, भारती चौधरी, वीरमाता कृष्णा बोडके, मुन्नीदेवी मिश्रा, वीरपिता, वीर मुलगा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
करण्यात आला.
जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, ध्वजदिन निधीसाठी मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या निधीतून आजी-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. सार्वजनिक शासकीय कार्यक्रमातून ध्वज निधी संकलनाचे उपक्रम राबविले पाहिजेत. आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी असलेल्या वसतिगृहांमध्ये अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले.
पोलीस उपअधीक्षक खेडकर म्हणाले की, सैनिक अधिकार्‍याचा पिता या नात्याने आपल्याविषयी आम्हाला संवेदना आहेत. आजी- माजी सैनिकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सोनवणे यांनी सांगितले की, आजी-माजी सैनिकांच्या कल्याणार्थ केंद्र, राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांमध्ये देशभावना निर्माण करण्याचा हा दिवस आहे. राष्ट्रीय एकात्मता वाढीस मदत होते, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस उपायुक्त काळे, शिक्षणाधिकारी जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. महेंद्र सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ लिपिक नारायण पाटील यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *