मिरगावच्या गणपती मंदिरातून चांदीचा मुकुट, पादुका, कळसाची चोरी

गेल्या आठवड्यात झाला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा; गुन्हा दाखल

शिर्डी महामार्गावर वावी व पाथरेदरम्यान मिरगाव शिवारात सिद्धिविनायकाचे पुरातन मंदिर आहे. शिर्डी महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरल्याने ते शेजारील शेतात नव्याने उभारण्यात आले. गेल्या आठवड्यातच नवीन मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पार पडला होता. प्रत्येक चतुर्थीला या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. रविवारी चतुर्थी असल्यामुळे शनिवारीच 45 हजार रुपये किमतीचा 28 भार वजन असलेला चांदीचा मुकुट मूर्तीला घालण्यात आला होता.
शनिवारी रात्री आठ वाजता मंदिर बंद करण्यात आले होते. रविवारी सकाळी सहा वाजता मंदिराची व्यवस्था बघणारे राजेंद्र पावले हे मंदिर उघडायला आले असता, दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी मूर्तीवर असलेला मुकुट व तेथील पितळी समई चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. मंदिरातील दानपेटीदेखील फोडण्यात आली होती. पावले यांनी परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिल्यानंतर गणेशभक्तांनी तेथे
धाव घेतली.
मंदिराच्या लहान घुमटावर असलेला 15 किलो वजनाचा पितळी कळसदेखील गायब असल्याचे आढळून आले.
याबाबत माहिती कळवल्यावर वावी पोलीस ठाण्यातील कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या घटनेत 45 हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट, सात हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पादुका, 15 हजार रुपये किमतीचा पितळी कळस, 5 हजार रुपये किमतीची समई, दानपेटीतील अंदाजे एक हजार रुपये रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद पावले यांनी वावी पोलीस ठाण्यात दिली.
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात चोरी झाल्याची वार्ता समजल्यावर मिरगाव, मलढोण, वावी, पाथरे, पिंपरवाडी, दुशिंगवाडी येथील असंख्य भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

चांदीच्या वाढत्या दरामुळे मंदिरे रडारवर

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मंदिरांमध्ये चोर्‍या होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नैताळे येथील मंदिरातील चोरीचा प्रकार ताजा असतानाच, हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मिरगाव शिवारातील सिद्धिविनायक मंदिरात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चोरीचा प्रकार घडल्यामुळे भाविकांचा संताप अनावर झाला आहे. सोने, चांदीच्या दरात सध्या कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे मंदिरांमध्ये असलेल्या मूर्तींच्या आभूषणांवर चोरट्यांची वक्रदृष्टी पडत आहे. साहजिकच देवच असुरक्षित बनले आहेत.

श्वानपथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण

वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार नाशिक येथून श्वानपथक तसेच ठसेतज्ज्ञांचे पथक तातडीने मंदिर परिसरात पाठवण्यात आले. तज्ज्ञांनी मंदिरातील विविध वस्तूंची तपासणी करून पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला. श्वानाने शेजारून जाणार्‍या शिर्डी महामार्गापर्यंतचा मार्ग दाखवला. त्यामुळे चोरटे महामार्गावरून पसार झाले असावे, असा अंदाज आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *