नऊ तोळे सोनेसह सात लाख रुपयांचा ऐवज लंपास
चांदवड/ सोग्रस : वार्ताहर
चांदवड तालुक्यातील राहुड येथे मुलीच्या लग्नाची लगबग सुरू असतानाच, एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून लग्नासाठी साठवलेले 9 तोळे सोन्याचे दागिने आणि 70 हजार रुपयांची रोकड असा एकूण सात लाख पाच हजार रुपयांचा ऐवज रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पीडित कुटुंबावर
दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, राहुड येथील रहिवासी गंगाधर विठोबा पवार यांच्या मुलीचे लग्न येत्या 30 तारखेला होणार आहे.
लग्नानिमित्त त्यांनी 9 तोळे सोने आणि रोख रक्कम घरात ठेवली होती. मंगळवारी दुपारी 12 ते 4 वाजेच्या सुमारास पवार कुटुंब लग्नाचे कपडे व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी चांदवड बाजारपेठेत गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी घरातील ऐवजावर डल्ला मारला.
यावेळी तपासासाठी एएसआय भाऊसाहेब गुळे, पो.हवा. अरुण गंभिरे, सुनील जाधव, प्रदीप आजगे, विक्रम बस्ते, मनोज अलगट, भूषण साळवे आणि चालक शंकर पवार यांचे पथक उपस्थित होते. लग्नासारख्या शुभकार्याच्या तोंडावर ही मोठी चोरी झाल्याने आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ करीत आहेत.
तपासासाठी पोलीस यंत्रणा सज्ज
चोरीची माहिती मिळताच चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी नाशिक येथून तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. कांबळे व त्यांच्या पथकाने घटनास्थळावरून ठसे (फिंगर प्रिंट्स) गोळा केले आहेत. तसेच नाशिकवरून टायगर नावाच्या श्वानासह विशेष पथक दाखल झाले होते. पोलीस हवालदार मुकुंद जाधव, कडाळे व टायगरने परिसरात कसून शोध घेतला.
Bold daylight robbery in Rahud