पावसाळा सुरू झाला म्हणून जरा बागेत नवीन झाडं लावण्यासाठी नर्सरीत रोपं आणण्यासाठी गेले… नर्सरीत छान छान झाडं होती… कुणाचे फुलं अतिशय सुंदर तर काहींचा वास मनमोहक, काहींना फुलं नव्हती पण पानं खूपच आकर्षक चकाकणारी, रंगीबेरंगी.. काही सावलीत वाढणारी नाजूक झाडं तर, काही वेल वर्गीय झाडं…खूप सुंदर सुंदर रोपं होती;.. सगळीच घरी न्यावीशी वाटत होतं…. सगळी नर्सरी फिरून झाली.. हवी असणारी रोपं बाजूला काढून झाली… पण नर्सरीत आल्यापासूनच एक झाड सारखं हसर्या चेहर्याने आमच्याकडे बघत होतं… ते होतं बोगनवेलीचे झाड…. पुनः पुन्हा त्याच्याकडे लक्ष जात होतं… तशी खूप सारी रोपं घरच्या बागेत होती पण बोगनवेल मात्र नव्हती… किती हसरं झाड होतं बरं ते! मग कसं बरं लावायचं राहून गेलं आपलं याची राहून राहून खंत वाटत होती…. मग जरा मोर्चा बोगनवेलीच्या भागाकडे वळवला… आता पुन्हा प्रश्न पडला कोणत्या रंगाचे झाड घ्यावं बरं.. बापरे! कितीतरी रंग होते त्यात पांढरा, जांभळा, गुलाबी, राणी, केशरी आणि कितीतरी.. त्यात पुन्हा रचना वेगवेगळी असलेली फुलं… एक-दोन वेगवेगळ्या रंगाची रोपं बाजूला काढली… पण न घेतलेली रोपं, घेतली नाही तरी हसर्या चेहर्याने बघत होती;… किती समजदार वाटली ती रोपं! अंगभर काटे असलेली तरीही फुलांना जपणारी…कसली तक्रार नाही, ना कसला राग, ना कसली अपेक्षा… फक्त हसरा चेहरा घेऊन वार्याच्या तालावर आपल्याच मस्तीत डोलत होती.
मोगरा, चाफा, जाईजुई, अबोली, फुलांचा राजा गुलाब या सगळ्यांवर किती छान छान कविता आहेत…लिहितांना त्याच्या कितीदा उल्लेख होतो!.. त्यांच्या उपमा दिल्या जातात;… मराठी -हिंदी चित्रपटात या सुंदर फुलांशी संबंधित कितीतरी गाणी आहेत…. पण बोगनवेल, सदाफुली ही किती दुर्लक्षित झालेली झाडं आहेत बरं… सदाफुली पण नावाप्रमाणे नेहमीच फुलेलेली असते…बोगनवेल, पण वर्षभर फुललेली असते…अगदी याची सुकलेली फुलंदेखील कधी कोमेजलेली नसतात.. ना या फुलांवर कुणी कविता करत, ना यांना देवाच्या पूजेत मान मिळत… तरी ना याची कुठली तक्रार, ना कसला त्रागा… कोणताही ऋतू असो सदैव हसतमुख;… प्रत्येकाच्या बागेची शान वाढवतात.. मग कोपर्यात जागा दया.. किंवा कंपाउंडच्या बाहेर जागा दया. या झाडाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ज्याला फुलं समजतो ती मुळी फुलं नसतातच.. या रंगीबेरंगी उपपर्णाच्या आत पांढर छोटुकलं फुल असते… त्याला ना रंग, ना गंध.. मग त्याकडे कसं कुणी आकर्षित होणार बरं.. म्हणून देवाने त्याला रंगीबेरंगी उपपर्ण दिलेत…ज्याला आपण फुलं समजतो!आपल्याच फुलाला जपण्याचा किती सुंदर पर्याय!. एकदा वाढ झाली की याला पाण्याची देखील गरज नाही… शिवाय कितीही वेळा तोडा.. हे झाडं पुन्हा हिरीरीने वाढणारच… किती समजदारपणा असतो बरं बोगनवेलीत! अगदी अशीच काही माणसं आपल्या आजूबाजूला असतात.. बोगनवेलीसारखी हसरी, खेळकर, अपेक्षा नसलेली… फक्त आनंद वाटणारी…. आपली आईदेखील अशीच असते नाही का!
सतत आपल्या कुटुंबाला हसत, खेळत आनंदी ठेवणारी.. कसलीही अपेक्षा नसलेली;… घरात कुणी थोडं जरी दुःखी दिसलं की त्याच्या मनातलं दुःख काढणारी…घरातल्या प्रत्येकाच्या मनाप्रमाणे वागणारी जणू बोगनवेली प्रमाणे प्रत्येकाच्या रंगात रंगणारी; … कुठलाही सणवार असो, आधी आपल्या मुलाबाळांची सगळी हौस करणारी, स्वतःला कधी काही मिळालं नाही तरी तक्रार न करणारी जशी बोगनवेल तिला तुम्ही तिची काळजी घेतली नाही तरी फुलणारी;…..संसारात कितीही अडचणी असल्या तरीही मुलांना जपणारी;.. जशी बोगनवेल अंगभर काटे असूनही फुलांना जपणारी;…घरातली व्यक्ती कधीही कुठून बाहेरून घरी आली की आई नेहमी आपली वाट बघत असते आणि हसतमुखाने आपले स्वागत करते; जशी की बोगनवेल कितीही दिवस गावाला जा तिला पाणी नाही मिळालं तरी घराच्या प्रवेशद्वारावर आपली वाट बघत असते आणि हसतमुखाने स्वागत करते!
आपल्या मुलांमध्ये कधी काही कमतरता असली की बोगनवेलीच्या रंगीबेरंगी उपपर्णाप्रमाणे झाकून घेणारी आई!….निसर्ग आपल्याला किती आणि काय काय शिकवतो! कधीही कोणतं कौतुक वाट्याला न आलेली आई आणि बोगनवेल… निःस्वार्थ, निशब्द प्रेम करायला नक्कीच शिकवतात.
Bougainvillea
- विष्णू वाघ भारतीय संस्कृतीमध्ये वृक्षांना केवळ वनस्पती म्हणून पाहिले जात नाही, तर त्यांच्यामध्ये देवत्व,…
- पुष्पा गोटखिंडीकर हिमालयाच्या कुशीत वसलेला, हिरव्यागार सौंदर्याने नटलेला, डोंगरदर्यांनी वेढलेला ’भूतान’ देश पाहायला मिळणे…
मविप्र संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांचा आज दि. 27 नोव्हेंबर 2026 रोजी वाढदिवस. त्यानिमित्त...…
आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा मोठा ताण असतो. शाळा, महाविद्यालय, शिकवणी, गृहपाठ आणि परीक्षांची तयारी…
कॉलेज म्हटले की, वर्गातील लेक्चर्स, परीक्षा, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आणि त्यासोबतच कधी तरी केलेला कॉलेज बंक!…
सिन्नर : प्रतिनिधी येथील माळेगाव एमआयडीसीतील एका कंपनीतून तब्बल तीन टन व्हे प्रोटीन पावडर गायब…