देवयानी सोनार
सोलापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदान कायद्याची कडक अंमलबजावणी न झाल्याने तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत. लग्नाचं वय निघून चाललं आहे, वधू पक्षांकडून अपेक्षा वाढल्या आहेत. कायम रोजगार नाही, सरकारी नोकरी नाही, मुलगा शेतीच करतो, अशा विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. आमची लग्नाची वयं उलटून चालली आहेत. आम्हाला एखादी बायको द्या, अशी प्रमुख मागणी करत क्रांती ज्योती परिषदेमार्फत मोर्चा काढला होता. इच्छुक नवरदेवांनी घोड्यावर बसून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
इतके दिवस वेगवेगळ्या समस्या, प्रश्न मार्गी लागावेत म्हणून मोर्चे निघत असत. सोलापूरचा मोर्चा मात्र लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून काढण्यात आला होता. मुलींचे कमी झालेले प्रमाण, वाढलेल्या अपेक्षा यामुळे लग्नासाठी मुलगी मिळणे दिवसागणिक अवघड समस्या बनू पाहत आहे.
सध्या लग्नाचा हंगाम सुरू असला तरी अनेक तरुणांचे लग्नाचे स्वप्न अधुरे राहते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात दर हजार मुलांमागे 940 तर राज्यात 889 एवढे मुलींचे प्रमाण कमी असल्याने लग्नासाठी नवरी मुलगी मिळण्यास अडथळे येत आहे. विवाहयोग्य मुलांसाठी मुली मिळणे कठीण होऊन बसले आहे. एकीकडे मुलांचे लग्नाचे वय 21वरून चाळीशीकडे झुकत चालले असल्याने वृद्ध आई-वडिलांना सून तर बहिणीसाठी वहिनी येणार कधी? असा प्रश्न लग्नाळू तरुणांना पडला आहे. नवर्या मुलांना नवरी देता का नवरी, असे म्हणायची वेळ आली आहे.
अनेकदा मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाही ही गोष्ट हेरून फसवणुकीचे प्रसंग वाढले आहेत.वधुवर सूचक केंद्रातूनही फसवणुुकीचे प्रकार उघडकीस येत आहे. या आणि अशा अनेक कारणांमुळे विवाहयोग्य मुलांचे वय वाढण्यासह नैराश्यातही भर पडत आहे. लग्न न जमण्याच्या नैराश्यातून आत्महत्यांचाही पर्याय तरुणांकडून घडत आहे. त्यामुळे पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
यानिमित्ताने सोलापूरकरांचा बायको मागण्याचा मोर्चा चांगलाच
चर्चेत आला आहे. विषयाच्या तळाशी गेल्यास समाजात मुलींपेक्षा मुलांना वंशाचा दिवा, वारस म्हूणन पाहण्याची मानसिकता दिसून येते आहे. तर जन्माला यायच्या आधीच मुलीचा गर्भ म्हणून, जन्माला आलेल्या मुलीला नकोशी करत कचर्याची वाट दाखविली जात आहे. अवैधरीत्या गर्भचाचण्यांना लगाम घालण्याची गरज निर्माण झाली असून, यासाठी कडक कायद्याची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे. असेच नुकत्याच सोलापूरमध्ये विवाहोत्सुक मुलांच्या मोर्चाने सर्वांचे लक्ष वेधले.
मुलींचे आर्थिक सक्षमीकरणासह उच्च शिक्षण आणि वाढत्या अपेक्षांमुळे मुली नकार देतात. तर मुलांचे बेरोजगारी, शिक्षण वा उच्च शिक्षित असेल तरी घरची बेताची परिस्थिती, शेती, व्यवसाय, उद्योगधंदा न करण्याची मानसिकता अशा एक ना अनेक कारणांमुळे विवाहयोग्य मुलांच्या लग्नासाठी नवरी मुलगी मिळत नाही हे वास्तव आहे. परंतु दर हजार मुलींच्या मागे केवळ 889 मुली हे देखील तितकेच महत्त्वाचे कारण आहे.
एकीकडे मुलींच्या जन्माचे स्वागत पहिली बेटी धनाची पेटी समजून स्वागत करण्यात येते. मात्र, दुसरी, तिसरी मुलगीच झाली म्हणून जन्माला येण्याअगोदर किंवा आल्यानंतर नकोशी करण्यात धन्यता मानणारे पालक दिसून येतात. वंशाला दिवाच हवा ही मानसिकता आजही दिसून येते. मुली प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. मुलांपेक्षा मुली उच्चशिक्षित झाल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांच्या बाबतीत अपेक्षाही वाढल्या आहेत. लग्नासाठी मुलांना नकार मिळण्याचे अनेक कारणे आहेत. दुसर्या बाजूचा विचार केल्यात मुलेही उच्च शिक्षीत असूनही सरकारी नोकर्या नाही, शेती नसेल तरीही मुली नकार देतात. ज्या मुलाला सरकारी नोकरी आणि शेती नसेल अशा मुलाला लग्नाचा अधिकार नाही का असा सवाल मुलांकडून व्यक्त केला जात आहे.
मुलांच्या आई-वडिलांना घरात सून यावी मुलाचा संसार वाढीस लागावा अशी इच्छा असते. परंतु मुलींची प्रत्येक समाजात कमी झालेली संख्या, मुलींच्या वाढत्या अपेक्षा यामुळे मुला-मुलींचे लग्नाचे वय वाढत चालले आहे.
मुला-मुलींचे समुपदेशन करणे गरजेचे आहे. दोन्ही बाजूने एकमेकांच्या गरजा, परिस्थिती, तडजोड करण्याची इच्छा याचा विचार होणे आवश्यक आहे. मुलींना समाजात योग्य स्थान, गर्भातील हत्या, नकोशीचे प्रमाण कमी झाल्यास आगामी पिढीसाठी नवरी मुलगी शोधण्याची गरज उरणार नाही.
माध्यमांचा प्रभाव परिणामकारक
समाजात घडणार्या गोष्टींचा प्रभाव मनोरंजन क्षेत्रातही पडताना पाहतो. त्यामुळे समाजातील वास्तव माध्यमांद्वारे आपल्या घरापर्यंत पोहचते आणि अनुकरण सुरू होेते. पूर्वी हॅप्पी एन्डीग दाखवताना हिरो हिरॉइनला मुलगा झाल्याचे दाखवत अशाने घराण्याला वारस मिळाला असे प्रसंग दाखवून प्रेक्षकांच्या मनावर बिंबविले गेले होते. त्यामुळे जुन्या काळातील सिनेमे, मालिकांमध्ये प्रेक्षकांनाही हॅपी एन्डींग माहिती असायचा. परंतु गेल्या काही वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात बदल झालेला दिसून येत आहे. टीव्ही मालिका, सिनेमे यातून हमखास मुलगीच जन्माला आलेली असे प्रसंग दाखवतात. त्यामुळेही समाजाची मानसिकता बदलण्यात मदत होत आहे.
देवयानी सोनार
स्वयंपाक करत असताना गॅस शेगडीवरील काच फुटली, गृहिणी बालंबाल बचावली सिडको : विशेष प्रतिनिधी चुंचाळे…
नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर कार दुचाकी अपघातात पती-पत्नी ठार ; दोन जण गंभीर जखमी मनमाड :आमिन…
बलात्काराच्या घटनेने नाशिक हादरले पतीला जामीन मिळवून देण्याचा बहाणा करून युवतीवर अत्याचार नाशिक :प्रतिनिधी…
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांना राष्ट्रपती पदक नाशिक: प्रतिनिधी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती पदक…
संजय दराडेंच्या रूपाने मखमलाबादच्या शिरपेचात तुरा " मखमलाबादचे भूमिपुत्र संजय दराडे यांना गुणवंत सेवेसाठी राष्ट्रपती…
माजी न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे निधन मुंबई: ज्येष्ठ विचारवंत, माजी न्यायाधीश आणि साहीत्य संमेलन माजी…