येवल्यात भरवस्तीत घरफोडी; 13 लाखांचा ऐवज लंपास

येवला : प्रतिनिधी
शहरातील गजबजलेल्या लोणार गल्ली परिसरात रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून मोठी घरफोडी केली आहे. या घटनेत चोरट्यांनी तब्बल 20 तोळे सोन्याचे दागिने, चार लाख रुपये रोकड आणि एक नवी अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा एकूण 13 लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल लंपास केला.
विशेष म्हणजे, पुरावा नष्ट करण्यासाठी चोरट्यांनी घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआरदेखील सोबत नेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त मंडल अधिकारी (सर्कल ऑफिसर) पुष्कराज पांडुरंग केवारे हे कुटुंबासह मुलाच्या नवसानिमित्त जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत मध्यरात्री चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. कपाटातील सोन्याचे दागिने, चार लाख रुपयांची रोकड आणि अंगणात उभी असलेली नवी अ‍ॅक्टिव्हा दुचाकी असा ऐवज घेऊन चोरटे पसार झाले. घटनेची माहिती मिळताच येवला शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तपासासाठी फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. येवला शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. चोरटे राजरोसपणे चोर्‍या करून पसार होत असल्याने व त्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे व संतापाचे वातावरण पसरले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून अधिक सतर्क राहावे आणि या चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Burglary in a densely populated area of ​​Yeola; valuables worth ₹13 lakh stolen

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *