नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा

13 जणांना अटक, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सिडको : प्रतिनिधी
नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांना दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवून जुगार खेळण्यास प्रवृत्त करत आर्थिक फसवणूक करणार्‍या टोळीवर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा टाकला. या कारवाईत 13 जणांना अटक करण्यात आली असून, जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण तीन लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्याच्या दृष्टीने तपास सुरू असताना गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. संतोष गुदणे, भुर्‍या मामू ऊर्फ फिरोज, अश्पाक शेख, शब्बीर आणि हुसेन हे साथीदारांच्या मदतीने रेल्वेस्थानकावर येणार्‍या प्रवाशांना लक्ष्य करत असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली होती. तीन पत्ती आणि काला-पिला नावाच्या जुगारात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून हातचलाखीने प्रवाशांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचेही समोर आले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी प्रवाशांचा वेश धारण करून रेल्वेस्थानक, बसस्थानक आणि परिसरातील हॉटेलमध्ये सापळा रचला. जुगार सुरू असल्याची खात्री होताच पथकाने छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये सिकंदर अब्दुल सत्तार रेहमान (वय 56, घाटकोपर, मुंबई), इस्तेखार हकीमुद्दीन अन्सारी (वय 65, नालासोपारा), अफजल लियाकत खान (वय 43, शिवाजीनगर, मुंबई), रियाजुद्दीन अब्दुल कयुम मनियार (वय 52, अंधेरी, मुंबई), ओंकार चंद्रकांत महाडिक (वय 38, चिपळूण), सुनीलकुमार कालीप्रसाद चंद्रवंशी (वय 45, मालाड, मुंबई), रवी जगदीश शर्मा (वय 59, अहमदाबाद), मोहम्मद शाहिद मेहबूब आलम शेख (वय 59, मालाड, मुंबई), गुरुदत्त किशन यादव (वय 27, छत्रपती संभाजीनगर), आरिफ रमजान खान (वय 52, गोवंडी, मुंबई), राकेशकुमार सीताराम सिंह (वय 54, भाईंदर), कुंदनसिंग जब्बरसिंग राजपूत (वय 55, मुंबई) आणि प्रदीप सुभाष अग्रवाल (वय 43, ठाणे) यांचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणूक आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गुन्हे शाखा युनिट एक करीत आहे.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमीज शेख, किरण शिरसाठ यांच्यासह पोलीस हवालदार आणि
कर्मचार्‍यांनी केली.

Crime Branch raids a gambling den in the vicinity of Nashik Road railway station

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *