कोंबडीचोरीनंतर गाव सोडलेला ‘कॅप्टन’ 15 वर्षांनी परतला

नाना-मामांकडून 50-50 रुपये घेऊन पलायन; हाँगकाँगमधून आले होते खुशालीचे पत्र

सिन्नर : प्रतिनिधी
बहुचर्चित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेनंतर त्याच्या भूतकाळातील अनेक किस्से पुन्हा चर्चेत आले आहेत. सिन्नर तालुक्यातील कहांडळवाडी येथून कोंबडीचोरीच्या आरोपामुळे गाव सोडून गेलेला हा तरुण तब्बल पंधरा वर्षांनी ‘हाँगकाँग रिटर्न कॅप्टन’ म्हणून परतल्याची कहाणी आजही गावकर्‍यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
कहांडळवाडी येथे एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अशोक ऊर्फ लक्ष्मणला गावात ‘खोडकर’ म्हणून ओळखले जात असे. शेतकर्‍यांच्या अंगणातील कोंबड्या चोरणे, अंडी चोरून विकणे अशा प्रकारांमुळे त्याची गावात बदनामी झाली होती. 1984 च्या सुमारास एका कोंबडीचोरीच्या प्रकरणात तो रंगेहाथ पकडला गेला. त्यानंतर गावात मोठा गोंधळ उडाला. अनेक शेतकर्‍यांनी त्यांच्या चोरीला गेलेल्या कोंबड्यांचा संशय त्याच्यावर घेतला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या वडिलांनी त्याला घराबाहेर काढल्याचे सांगितले जाते.
त्या रात्री गावातील एका परिचिताकडे मुक्काम केल्यानंतर दुसर्‍या दिवशी तो नोकरीच्या शोधात बाहेर पडणार असल्याचे सांगून निघाला.
गावातील एका नानांनी त्याला खर्चासाठी 50 रुपये दिले आणि त्यांच्या सायकलवर बसवून वावी बसस्थानकात सोडले. तेथे भेटलेल्या मामांनीही त्याला आणखी 50 रुपये दिले. अशा प्रकारे दोघांकडून मिळालेले शंभर रुपये खिशात घालून अशोकने गावाचा निरोप घेतला.
यानंतर अनेक वर्षे तो कुठे आहे, काय करतो, याचा कोणालाच मागमूस नव्हता. मात्र, तब्बल 12 वर्षांनंतर वावी बसस्थानकात सोडणार्‍या त्या नानांना थेट हाँगकाँगमधून पत्र आले. त्यात ‘मी इथे कामाला लागलो आहे, मजेत आहे. लवकरच तुम्हाला भेटायला येईन,’ असे लिहून त्याने नानांनी दिलेल्या त्या पन्नास रुपयांची आठवण करून आभारही मानले होते.

‘Captain’ who left village after chicken theft returns after 15 years

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *