लासलगाव : वार्ताहर
लासलगाव येथील मेन रोडवर असलेल्या एका हॉटेलसमोर पार्क केलेल्या किराणा दुकानदाराच्या वेगनआर कारची काच फोडून चोरट्यांनी तब्बल 70 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी घडली. या धाडसी चोरीमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, व्यापार्यांसह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार,भरवस फाटा येथील अभय किराणा दुकानाचे मालक आनंदा शांताराम घोडेगावकर हे किराणामाल खरेदी करण्यासाठी लासलगाव येथे आले होते. किराणामाल खरेदी केल्यानंतर औषधोपचार घेण्यासाठी आणि नाश्ता करण्यासाठी त्यांनी मेन रोडवरील एका हॉटेल समोर आपली कार (एमएच 15 जीआर 7801) उभी केली. घोडेगावकर हॉटेलमध्ये थांबलेले असताना या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी कारच्या मागील डाव्या बाजूची काच फोडली. त्यानंतर कारमध्ये किराणा मालाशेजारी ठेवलेल्या कापडी पिशवीतील सत्तर हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याआधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कोते यांच्या मार्गदर्शनाखाली चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याप्रकरणी लासलगाव पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, चोरट्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी स्थानिक व्यावसायिक आणि नागरिकांनी केली आहे.
Car window smashed and ₹70,000 stolen in Lasalgaon.