घोरवड घाटात दीडशे फूट खोल दरीत कोसळली कार 

एक ठार, दोन गंभीर
सिन्नर : प्रतिनिधी 
घोटी महामार्गावरील घोरवड घाटात गुरुवारी (दि.9) मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. या भीषण अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. अंकुश संतू जमदाडे (30 रा. वैतरणा, ता. इगतपुरी) असे मृताचे नाव आहे.
गुरुवारी रात्री सिन्नरकडून घोटीकडे जाणारी टाटा टियागो या कंपनीची कार (एमएच/15-जीएल/2745) सिन्नर-घोटी मार्गाने जात असताना घोरवड घाटातील एका वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली. कारमध्ये अंकुश जमदाडे, अनिल गोपाळ भोर (रा. रायांबे, ता. इगतपुरी), नामदेव किसन धांडे (रा. भगूर, ता. शेवगाव, जि. नगर) असे तिघे होते. कारने पलट्या मारल्याने तिघेही गंभीर जखमी झाले.
जखमी अवस्थेत अनिल भोर व नामदेव धांडे अंधारात खोल दरीतून वाट काढत बाहेर आले. त्यानंतर त्यांनी सिन्नर पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गणेश परदेशी, सुदाम धुमाळ, पोलीस नाईक विनायक आहेर, नवनाथ शिरोळे, रवींद्र चिने आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अॅम्बुलन्स चालक पुरुषोत्तम भाटजिरे, शुभम कातकडे या दोघांनी दरीमध्ये जाऊन जखमी अंकुश जमदाडे यांना वरती आणले. सिन्नर ग्रामीण रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जखमींवर धामणगाव येथील एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस नाईक विनायक आहेर पुढील तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *