नाशिकरोड रेल्वे स्थानकात दीड कोटीची रोकड तरुणाकडून जप्त

नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
छठपूजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या विशेष तपासणीदरम्यान रेल्वे सुरक्षा दलाने अमृत भारत एक्स्प्रेसमधून तब्बल एक कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड जप्त केली. याप्रकरणी संदीप बाळासाहेब भामरे (वय 24, रा. गोमवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली, सध्या रा. भवानी पेठ, जळगाव) या तरुणाला ताब्यात घेण्यात आले आहे. रोकड कुठून आणली, कोणाची आहे आणि ती कशासाठी नेली जात होती, याबाबत तो समाधानकारक माहिती किंवा वैध कागदपत्रे देऊ शकला नाही. त्यामुळे रोकड आणि संबंधित तरुणाला पुढील कायदेशीर कारवाईसाठी आयकर विभागाच्या अन्वेषण पथकाकडे सुपूर्द करण्यात आले.
12 नोव्हेंबर रोजी नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर अमृत भारत एक्स्प्रेस दाखल होत असताना आरपीएफचे प्रधान आरक्षक नरेंद्र पाडवी, आरक्षक गौतम बिराडे, रविंद्र राठोड आणि अन्य कर्मचारी तपासणी करीत होते. यावेळी जळगाव कडून मुंबईकडे बॅग घेऊन जाणार्‍या संदीप भामरे याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने जवानांनी त्याला थांबवून चौकशी केली. बॅगेतील साहित्याबाबत समाधानकारक उत्तर न मिळाल्याने उपनिरीक्षक लवकुश वर्मा आणि सहायक उपनिरीक्षक दिनेश यादव यांनी स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत बॅगेची तपासणी केली. त्यात पाचशे, दोनशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचे गठ्ठे आढळले. मोजणी केली असता एकूण 1 कोटी 48 लाख 64 हजार रुपयांची रोकड असल्याचे स्पष्ट झाले.

पाचशेच्या नोटांचे सर्वाधिक गठ्ठे
जप्त रोकडमध्ये पाचशे रुपयांच्या 29 हजार 322 नोटा (1 कोटी 46 लाख 61 हजार रुपये), दोनशे रुपयांच्या 715 नोटा (1 लाख 43 हजार रुपये) आणि शंभर रुपयांच्या 600 नोटा (60 हजार रुपये) यांचा समावेश आहे. त्याच्याकडे प्रवासासाठी घेतलेले जनरल तिकीटही आढळले. रोकडची मोठी रक्कम आणि तिच्या स्रोताबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने आरपीएफने तातडीने नाशिकच्या आयकर विभागाच्या अन्वेषण युनिट-एक च्या उपसंचालकांना माहिती दिली. त्यानंतर रोकड आणि तरुणाला आयकर विभागाच्या अधिकार्‍यांच्या ताब्यात देण्यात आले. भुसावळ विभागाचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नाशिकरोड आरपीएफ पोस्टचे निरीक्षक नवीन प्रताप सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

 

 

Cash worth 1.5 crore rupees seized from a youth at Nashik Road railway station

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *