सप्तशृंग निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवास प्रारंभ

हजारो भाविकांची उपस्थिती; गड परिसरात ‘जय माता दी’चा जयघोष

सप्तशृंगगड : वार्ताहर
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या चैत्रोत्सवाला रामनवमीच्या मुहूर्तावर उत्साहात अन् भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. गडावर पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.
उत्सवाच्या प्रारंभी विविध धार्मिक विधी, पूजा-अर्चा यांसह देवीच्या महावस्त्र व अलंकारांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गड परिसर ‘जय माता दी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. सकाळची पंचामृत महापूजा नाशिकचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश राहुल एन. रोकडे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी संस्थानच्या अध्यक्षा तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती के. के. पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी कश्मिरा संखे, कळवण तहसीलदार रोहिदास वारुळे, विश्वस्त अ‍ॅड. ललित निकम यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
यात्रा कालावधीत (26 मार्च ते 3 एप्रिल) गडावर खासगी वाहतूक पूर्णतः बंद ठेवली आहे. नांदुरी येथून एसटी बसद्वारे भाविकांची ने-आण करण्यात येत आहे. गडापासून एक किलोमीटरवर तात्पुरते बसस्थानक उभारले आहे. दरम्यान, चैत्रोत्सवानिमित्त प्रसिद्ध मराठी अभिनेते चिन्मय उदगीरकर यांनीही काल सप्तशृंगीदेवीची आरती करून दर्शन घेतले. चैत्रोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, प्रकाश पगार, यशवंत देखमुख, प्रशांत निकम, सुनील कासार, विश्वनाथ बर्डे, विजय भवरे, नारद आहिरे, शाम पवार, मुरलीधर गायकवाड, मुरलीधर गावित यांच्यासह सर्व विभागांचे कर्मचारी व स्वयंसेवी संस्था सक्रिय कार्यरत आहेत.

दर्शनासाठी मंदिर 24 तास खुले

चैत्रोत्सवकाळात भाविकांसाठी मोफत महाप्रसादाची व्यवस्था केली असून, मंदिर 24 तास दर्शनासाठी खुले राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात 311 सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आपत्कालीन परिस्थितीसाठी अग्निशमन सेवा व प्रथमोपचार केंद्र 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहे. भाविकांसाठी अल्पदरात निवास व्यवस्था, तसेच शिवालय तीर्थावर निवारा शेड (मंडप) उभारले आहेत. ई-टॉयलेट, पाणपोई, चप्पल स्टँडची सोय केली आहे. अखंडित वीजपुरवठ्यासाठी तीन जनरेटरची व्यवस्था असून, गड परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हंगामी कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे.

Chaitro festival of Saptashrunga Niwasini Devi begins

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *