सातपूर-पाटील पार्क येथे लागलेल्या आगीत गॅरेजसह दोन शॉप जळून खाक

अग्निशमन विभागाचे आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न

सातपूर : प्रतिनिधी
अंबड लिंकरोड परिसरातील पाटील पार्क येथे गुरुवारी (दि. 26 मार्च) दुपारी सुमारे दीड ते दोन वाजेच्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत बायकर्स पॉइंट गॅरेज, अगरबत्ती कारखाना तसेच ऍक्रेलिक शॉप पूर्णपणे जळून खाक झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की, परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या आगीत गॅरेजमधील सहा वाहने, कॉम्प्रेसर मशीन तसेच मोठ्या प्रमाणात स्पेअर पार्ट्स जळून नुकसान झाले आहे. तसेच अगरबत्ती कारखाना जळाल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच ऍक्रेलिक शॉपमधील रेडी मटेरिअल व शॉपमधील साहित्य यांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संदीप तांबे यांनी तात्काळ सातपूर अग्निशमन विभागाला कळविले. तसेच अश्विन महाजन व स्थानिक नागरिकांनीही बचावकार्य करण्यात मदत केली. दरम्यान, नगरसेवक निवृत्ती अण्णा इंगोले यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. सातपूर अग्निशमन विभागाचे अधिकारी एस. आर. पगार हे आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे पाटील पार्क परिसरात मोठी खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Two shops including a garage were gutted in a fire at Satpur-Patil Park

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *