पंतप्रधान मोदींचा इशारा
नवी दिल्ली : प्रतिनिधी
शेतीतल्या रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दांत चिंता व्यक्त केली आहे. शेतीतली रसायने धरती मातेला मारत आहेत, असे म्हणत त्यांनी शेतकर्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे.
भारत कृषी परिषद – किसान तक कॉन्फरन्समध्ये बोलताना मोदींनी नैसर्गिक शेती आणि सेंद्रिय शेती यातील फरकही स्पष्ट केला. सेंद्रिय शेती म्हणजे केवळ रसायनमुक्त शेती नव्हे, तर नैसर्गिक शेती म्हणजे जमिनीची नैसर्गिक सुपीकता जपणारी, गायीच्या शेण-गोमूत्रावर आधारित, कमी खर्चाची आणि मातीतील जीवजंतू वाचवणारी शेती – असा त्यांचा संदेश होता. शेतीला स्मार्ट बनवणे, पिकांत विविधता आणणे आणि अन्नदात्याला कृषी उद्योजक बनवणे हेच विकसित भारताचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मोदींनी शेतकर्यांना दिलेल्या संरक्षणाचाही लेखाजोखा मांडला. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे भाव प्रचंड वाढले असताना, तो बोजा शेतकर्यांवर न टाकता केंद्र सरकारने आतापर्यंत सुमारे 16 लाख कोटी रुपये खत अनुदानावर खर्च केले, असे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात 3,000 रुपयांना मिळणारी युरियाची गोणी भारतीय शेतकर्याला 300 रुपयांपेक्षा कमी किमतीत दिली जाते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. तरीही आता पुढचा मार्ग हा अनुदानावर अवलंबून राहण्याचा नाही, तर माती वाचवण्याचा आहे, असा मोदींचा सूर होता. शेतीचा खर्च कमी करायचा असेल आणि पुढच्या पिढीसाठी जमीन सुपीक ठेवायची असेल, तर नैसर्गिक शेती हाच पर्याय असल्याचे आवाहन त्यांनी केले.
Chemical fertilizers are killing Mother Earth.