कावडधारक व तृतीयपंथीयांच्या उपस्थितीने गड दुमदुमला
सप्तशृंगगड : प्रतिनिधी
दसर्याला नवरात्रोत्सवाची सांगता झाल्यानंतर सप्तशृंगगडावर काल (रविवारी) कोजागरी पौर्णिमेनिमित्त छबीना उत्सव पार पडला. रविवार आणि पौर्णिमा असा योग जुळून आल्यामुळे गडावर भाविक, कावडीधारक आणि तृतीयपंथीयांची अभूतपूर्व गर्दी उसळली होती. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर राज्यांमधून आलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीने संपूर्ण गड परिसर भक्तिमय झाला होता.
विविध नद्यांच्या पवित्र जलाने आई सप्तशृंगीला महाअभिषेक करण्यात आला. मुळा, तापी, ओंकारेश्वर, उबीन व इंदूर येथील नर्मदा, भीमा आणि गोदावरीच्या पवित्र जलाने अभिषेक करण्यात आला. काल सकाळी सात वाजता पंचामृत महापूजा झाली. दुपारी 12.30 ते रात्री 8.30 दरम्यान कावडधारकांनी आणलेले जल श्री भगवती मंदिरात स्वीकारण्यात आले. त्यानंतर रात्री 8.30 ते 12 पर्यंत श्री भगवतीचा जलाभिषेक व पंचामृत महापूजा झाली आणि रात्री 12 वाजता श्री भगवतीची महाआरती झाली. आज, सोमवारी (ता. 26) सकाळी सात वाजता देवीची पंचामृत महापूजा होईल. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता शांतीपाठानंतर महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल.
तृतीयपंथीयांची कुचंबणा
या महोत्सवात कावडधारकांसह मोठ्या संख्येने तृतीयपंथीयदेखील दाखल झाले होते. सप्तशृंगीदेवी कुलदैवत असल्याने दरवर्षी येत असल्याचे तृतीयपंथीयांनी सांगितले. गडावर येणारे भाविक व आमच्यासारख्या घटकांसाठी हक्काची निवासव्यवस्था किंवा मूलभूत सुविधा नसल्याने जादा पैसे देऊन रूम व पाणी विकत घ्यावे लागते. शासनाने व देवी संस्थानने याकडे लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी ’तृतीयपंथीय कल्याण’च्या माध्यमातून करण्यात आली आहे. सप्तशृंगगडावरील धोंड्या-कोंड्याच्या बसस्थानकापासून पहिली पायरी, पोलीस चौकी परिसर आणि मम्हादेवी परिसरात शौचालये व पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली नसल्यामुळे महिलावर्ग, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी कुचंबणा झाली.
पंचामृत महापूजा व कावडीद्वारे जलाभिषेक
रविवारी (दि. 25) सकाळी विधानपरिषदेचे आमदार गोकुळ गिते आणि विश्वस्त संस्थेचे देणगीदार भाविक सुदर्शन हेगडे यांनी सपत्नीक देवीची पंचामृत महापूजा केली. रविवारी सायंकाळी विविध ठिकाणांवरून आलेल्या कावडधारकांनी आणलेल्या पवित्र जलाने देवीवर जलाभिषेक करण्यात आला. सायंकाळची महापूजा विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष तथा धर्मादाय सह-आयुक्त विवेक सोनूने यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनीही देवीचे दर्शन घेतले. या प्रसंगी कळवणच्या उपविभागीय अधिकारी कश्मिरा संखे, तहसीलदार रोहिदास वारुळे, ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदर्शन दहातोंडे, इस्टेट कस्टोडियन प्रकाश पगार, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, सुरक्षा अधिकारी यशवंत देशमुख आणि मंदिर पर्यवेक्षक सुनील कासार आदी उपस्थित होते.
प्रशासन, एसटी महामंडळाचे विशेष नियोजन
वाहतूक व्यवस्था : नवरात्रोत्सवाप्रमाणेच कावडयात्रेसाठी प्रशासकीय यंत्रणा, सप्तशृंगीदेवी न्यास आणि ग्रामपंचायत सज्ज ठेवण्यात आली होती. रविवारी (दि. 25) नांदुरी ते सप्तशृंगगड रस्ता खाजगी वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. एसटी महामंडळाने नांदुरी ते सप्तशृंगगडदरम्यान 130 बसेस, तर नाशिक विभागातील 11 आगारांतून सुमारे 250 बसेसचे नियोजन केले होते. कळवण ते नांदुरी रस्त्यावर कावडधारकांची प्रचंड गर्दी असल्याने कळवणवरून नाशिककडे जाणारी वाहतूक अभोणामार्गे वळवण्यात आली. मार्गावर अनेक स्वयंसेवी संस्थांकडून कावडधारक व पदयात्रेकरूंसाठी विसावा, पिण्याचे पाणी, फराळ आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मंदिरामध्ये दूरवरून येणार्या कावडधारकांकडून पवित्र जल घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली. यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
‘Chhabina’ festival celebrated at Saptashrunga Gad