ख्रिस्त जयंतीचा संदेश…

ईश्वराचा शब्द जाहला माणूस, जनामध्ये वास त्याने केला. परमेश्वरी प्रेम, मानवी रूप धारण करून त्याने मानवामध्ये वस्ती केली. ईश्वरी प्रेमाचे हेच रहस्य आम्ही ख्रिस्त जयंतीदिनी साजरा करत आहोत. पित्याने आम्हासाठी सर्व देणग्यांहून श्रेष्ठ अशी देणगी दिली आहे. आमचा प्रकाश प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माद्वारे आजची ही नाताळची रात्र उजळून निघत आहे. ख्रिस्त जयंतीच्या या मंगलमयी क्षणी मानवासाठी नवजन्माची नवज्योती उगवली आहे.
देवाचा मानवाशी व मानवाचा पुन्हा देवाशी संबंध जोडला गेला आहे. संत पॉल म्हणतो, तारणाची ही देणगी मिळविण्याकरिता आम्ही काहीच केले नाही. उलट पाप करून देवाच्या विरुद्धच वागलो, पण देवपित्याने आमच्यावरील प्रेमाने व करुणेने आपला एकुलता पुत्र दिला व आमचे तारण केले; परंतु जोपर्यंत आपल्याठायी ख्रिस्ताचा आत्मा वस्ती करत नाही तोपर्यंत आपल्याला ख्रिस्त जयंतीचा खरा आनंद लाभू शकत नाही.
स्व. पोप फ्रान्सिस म्हणतात, ‘ख्रिस्त जयंती आपल्याला आठवण करून देते की, येशू पित्याच्या रूपात देवाचा खरा चेहरा प्रकट करण्यासाठी आला होता, जेणेकरून आपण सर्व त्याची मुले आणि म्हणून एकमेकांचे भाऊ आणि बहिणी बनू शकू.’ ‘दुसर्‍यासाठी केलेले काहीही स्वतःसाठी केले जाते.’ ‘स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे आवडते ते करणे नव्हे, तर आपल्याला जे करायला हवे ते करण्याचा अधिकार असणे.’ जसे ‘मी माझ्या डोळ्यांनी तुमच्या डोळ्यांत पाहिले आहे. मी माझे हृदय तुमच्या हृदयाजवळ ठेवले आहे.’ ही सहृदयीता ख्रिस्त आम्हाला देतो. तो आम्हाला आमच्या बंधनातून स्वतंत्र करतो. परंतु ‘स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला जे आवडते ते करणे नव्हे, तर आपल्याला जे करायला हवे ते करण्याचा अधिकार असणे.’ ‘मी माझ्या डोळ्यांनी तुमच्या डोळ्यात पाहिले आहे. मी माझे हृदय तुमच्या हृदयाजवळ ठेवले आहे.’
ख्रिस्त जयंती म्हणजे केवळ दोन हजार वर्षांपूर्वी जन्मलेल्या बाळाची आठवण नाही, तर देवाने आमच्या दुभंगलेल्या जगात प्रवेश करून ती पोकळी भरून काढण्यासाठी दिलेली देणगी आहे, याचे स्मरण होणे गरजेचे आहे. येशू हा देवाचा शब्द नव्हे, तो स्वतः शब्द आहे, जो शब्द राजवाड्यात नाही, तर गरिबीत येऊन देह धारण करतो, तो सत्तेत वस्ती करीत नाही तर तो मानवी अगतिकतेत जन्म घेतो. तो गोंगाटात नाही, तर निरव शांतीमध्ये येतो. आजचे जग विभागलेले आणि जखमी आहे. विषमता, हिंसा, असहिष्णुता आणि भीतीमुळे समाज तुटत चालला आहे. मानवी नाती ताणली गेली आहेत. समुदाय ध्रुवीकरणाच्या गर्तेत अडकले आहेत आणि राष्ट्रे अस्थिरतेशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत शांतता ही आता दूरची संकल्पना न राहता तातडीची गरज बनली आहे. तुटलेपणातून शांततेकडे जाण्यासाठी असा मार्ग हवा जो मानवी सन्मान पुनर्स्थापित करतो, जखमा भरून काढतो आणि मानवतेला पुन्हा जोडतो.
प्रभू येशू हा तुटलेल्या अवस्थेतून शांततेकडे येशू दाखवतो तो मार्ग म्हणजे प्रेम, दया, शांती, समेट. येशू ख्रिस्ताचा संदेश कोणत्याही एका धर्मापुरता मर्यादित नसून थेट मानवी अंतःकरणाशी संवाद साधतो. त्यांच्या दृष्टीतील शांतता म्हणजे केवळ संघर्षाचा अभाव नाही, तर न्याय, करुणा, क्षमा आणि जबाबदारी यांची उपस्थिती आहे. ख्रिस्त जयंतीचा संदेश हा रणांगणे नव्हे, तर पूल उभारा. भिंती आणि रणांगणे दरी वाढवतात; पूल समज आणि ऐक्य निर्माण करतात. संवाद, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि सहकार्य समाजाला एकत्र बांधतात. त्याचबरोबर पर्यावरणाचा र्‍हास मानवाच्या अस्तित्वालाच धोका आहे. वृक्षलागवड, संवर्धन आणि निसर्गाची काळजी घेणे म्हणजे पृथ्वीशी शांतता प्रस्थापित करणे होय. जेव्हा समाज न्याय निवडतो, दुर्बलांची काळजी घेतो, निसर्गाचे रक्षण करतो आणि मानवी सन्मान जपतो, तेव्हा शांतता केवळ कल्पना राहत नाही, तर जगलेली वास्तविकता बनते. हाच तो मार्ग आहे तुटलेल्या अवस्थेतून शांततेकडे नेणारा मार्ग म्हणजे येशू. वर्ष 2025 मध्ये जागतिक कॅथॉलिक ख्रिस्त सभेने जन्म घेत असलेल्या ख्रिस्ताकडे एक आशेचा किरण म्हणून जो जगामध्ये लोकांना चांगल्या जीवनाचा मार्ग म्हणून, अंधाराला चिरून प्रकाशाची किरणे दाखवतो. निराशेच्या गर्तेत असलेल्या जगाला आशा दाखविण्यासाठी येत आहे. कारण आम्ही सारेच आशेचे यात्रेकरू आहोत. आज तो ख्रिस्त आमच्यामध्ये कुठे जन्माला येण्याची वाट पाहत आहे. आमच्या नैराश्यामध्ये, आमच्या अनुत्तरित प्रश्नांमध्ये, आमच्या जखमी संबंधांमध्ये, की आमच्यात लपलेल्या भीतीमध्ये. बेथलेहेम येथे जन्मलेले ते बाळ हळुवारपणे येत आहे, आपल्याला दडपून टाकण्यासाठी नाही, तर आपल्यासोबत राहण्यासाठी, आपल्यातील अंधाराचा न्याय करण्यासाठी नाही, तर तो प्रकाशित करण्यासाठी, परिपूर्णतेची मागणी करण्यासाठी नाही, तर आशा जागृत करण्यासाठी. या ख्रिस्त जयंतीत आपल्याला आपला अहंकार सोडून देण्याची, आपल्या हृदयात जागा करण्याची आणि हे शोधण्याची संधी मिळो. कारण इमॅन्युएल म्हणजे देव आमच्यासोबत आहे. ही ख्रिस्त जयंती आपल्या सर्वांच्या जीवनात आनंद, आशा, प्रेम, दया आणि सर्व धर्मांचा आदर करण्यासाठी बोलावत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *