सिन्नर : प्रतिनिधी
सिन्नर शहरातील तानाजी चौकात बुधवारी (दि. 24) सायंकाळी सुमारे 5.30 वाजता अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. संजय बत्रा यांच्या मालकीच्या जुनाट तीन मजली वाड्याला आग लागून तिसर्या मजल्यावरील अडगळ व गवताने क्षणात पेट घेतला आणि काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले.
आगीची माहिती मिळताच सिन्नर नगरपालिका तसेच माळेगाव एमआयडीसी येथील दोन अग्निशमन बंब घटनास्थळी धावून आले. वाड्याचा लाकडी दरवाजा बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तिसर्या मजल्यावरील सागवानी लाकडाने आगीला अधिकच भडका दिल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल दीड तास लागला.
हा वाडा अडगळीत पडलेला असून त्यात कोणीही वास्तव्यास नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, इमारतीच्या शेजारी दाट नागरी वस्ती असल्याने मोठा अनर्थ टळला. वेळेवर केलेल्या कारवाईमुळे आगीची झळ आजूबाजूच्या वस्तीकडे पसरली नाही, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.