देशभक्ती, हजरजबाबीपणा, विनम्रता, वाक्चातुर्य आणि आपल्या वाणीने करोडो देशवासीयांबरोबरच विरोधकांच्याही हृदयसिंहासनावर राज्य करणारे अतुलनीय व्यक्तिमत्त्व म्हणजे भारताच्या राजकारणातील पितामह अटलबिहारी वाजपेयी असे म्हटले तर ते निश्चितच अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही. तीन वेळा देशाच्या सर्वोच्च अशा पंतप्रधानपदावर आरूढ झाल्यानंतरही त्यांचे पाय सतत जमिनीवरच राहिले आणि यातच त्यांचा खरा मोठेपणा दिसून येतो. अशा या महान व्यक्तीची आज 98 वी जयंती. मात्र, त्यांचे विचार आणि त्यांचे आचरण आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असेच आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचा जीवन परिचय करून देणारा हा लेख…
25 डिसेंबर 1924 ला ग्वाल्हेर येथील मध्यमवर्गीय कुटुंबात अटलजींचा जन्म झाला तेव्हा मोठे होऊन ते देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान होतील असे कुणालाही वाटले नव्हते; परंतु आपल्या कर्तबगारी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर हे पद भूषवून संपूर्ण विश्वात त्यांनी आपल्या नावाचा ठसा उमटविला. त्यांचे वडील कृष्णबिहारी वाजपेयी शिक्षक होते. शिक्षणात अटलजींना त्यांचाच खरा वारसा लाभला. अटलजींनी हिंदी, इंग्रजी आणि संस्कृतमध्ये बी.ए.ची पदवी मिळवली.नंतर कानपूर येथे त्यांनी राज्यशास्त्र विषयात एम.ए. केले. शालेय जीवनापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. हिंदीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व होते. स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात त्यांनी अनेक दैनिकांत संपादनाचे कामही केले. स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1951 मध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली, तेव्हापासून वाजपेयी या पक्षाशी निगडित होते. मुखर्जींचे कट्टर अनुयायी म्हणून ते गणले जात. राजकारणाचे बाळकडू त्यांना खर्या अर्थाने येथूनच मिळाले आणि त्यांनी नंतर कधी मागे वळून बघितलेच नाही. 1957 मध्ये प्रथम त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले. त्यांनी आपल्या वाणीने आणि प्रभावी वक्तृत्वाने संसद गाजवून आपली निवड सार्थ ठरवली. यानंतर 2004 पर्यंत म्हणजे पाच दशकांहून अधिक काळ संसदेचे म्हणजे दहा वेळा लोकसभा, तर दोन वेळा राज्यसभेचे सदस्यत्व भूषवून दीर्घकाळ संसदपटू होण्याचा बहुमानही मिळवला. त्यांच्या राजकीय जीवनात त्यांच्यावर एकही आरोप झाले नाहीत. यावरूनच त्यांच्या महानतेची साक्ष पटते. 1968 मध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या निधनानंतर त्यांच्यावर जनसंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली, तेव्हा त्यांनी नानाजी देशमुख, बलराज मधोक आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या मदतीने जनसंघाच्या बळकटीसाठी महत्त्वाचे योगदान दिले. 1977 मध्ये जनसंघ जनता पार्टीत विलीन झाला. 1977 च्या निवडणुकीत जनता पार्टीचे सरकार मोरारजीभाई देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले, तेव्हा वाजपेयी यांच्याकडे परराष्ट्र व्यवहार खात्याची जबाबदारी आली आणि त्यांनी या पदास पुरेपूर न्याय दिला. या काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची मान उंचावण्याचे काम त्यांनी केले. आपापसांतील कलहामुळे देसाई सरकार पडले आणि जनता पक्षही
फुटला. 1980 मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा पहिला बहुमान वाजपेयी यांनाच मिळाला. 1984 मध्ये इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि त्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्षांना धक्का बसला. भाजपाचेही फक्त दोन सदस्य निवडून आले होते. परंतु त्याने खचून न जाता वाजपेयी आणि त्यांच्या सहकार्यानी जोमाने पक्षबांधणी केली आणि 1989 च्या निवडणुकीत या पक्षाने 88 तर यानंतर 1991 च्या निवडणुकीत 120 जागा जिंकण्याचा करिष्मा करून दाखविला. वाजपेयींच्या संघटनकौशल्याची त्यामुळे वारेमाप तारिफ झाली. 1991 मध्ये भाजपा प्रमुख विरोधी पक्ष बनला. या काळात त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीच्या सहाय्याने आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी संसद दणाणून सोडली होती. सत्तारूढ पक्षाच्या कारभाराचा ते खरपूस समाचार घेत. त्यामुळे वाजपेयींच्या या शाब्दिक हल्ल्यांना तोंड देताना सत्तारूढ पक्षाची धांदल उडाल्याचे चित्र अनेकदा दिसले. त्यांच्या या कार्याची पावती म्हणूनच 1993 ते 1995 पर्यंत त्यांना संसदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविण्याची संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या प्रभावी भाषणांनी संसद गाजवून उत्कृष्ट संसदपटू हा किताबही पटकावला. त्यामुळेच 1996 च्या निवडणुकांआधी भाजपतर्फे त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते. 1996 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा जास्त जागा जिंकणारा मोठा पक्ष ठरला होता. वाजपेयींचा पंतप्रधान म्हणून शपथविधीही झाला. परंतु सभागृहात बहुमत सिद्ध करता न आल्याने 13 दिवसांतच वाजपेयींना राजीनामा देणे भाग पडले होते. 1998 च्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्या. वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले आणि हे सरकार 13 महिने टिकले; परंतु सत्तेवर आल्यानंतर अवघ्या महिनाभरातच पोखरण येथे अणुचाचणी घेऊन आपल्या देशाच्या क्षमतेची खरी ओळख त्यांनी संपूर्ण विश्वाला करून दिली होती. 1999 च्या मे ते जुलैदरम्यान कारगिल युद्ध झाले.
यावेळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी बळकावलेला भारताचा भूभाग भारतीय सैन्याने परत मिळवला आणि वाजपेयींच्या नेतृत्वाची खूपच प्रशंसा झाली. त्यांची लोकप्रियताही वाढली. याचा फायदा त्यांना 1999 च्या लोकसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीनंतर वाजपेयी तिसर्यांदा भारताचे पंतप्रधान झाले. या काळात त्यांनी आर्थिक आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भरीव सुधारणा घडवून आणल्या.
राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि पंतप्रधान ग्रामसडक योजना हे त्यांचे दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्प. सन 2000 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी भारतास भेट दिली त्यावेळी उभय देशांतील आर्थिक आणि औद्योगिक संबंध अधिक बळकट झाले होते. 2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसप्रणीत सरकार सत्तेवर आले. यानंतर काही काळाने वाजपेयी यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली आणि 2009 ची निवडणूकही ते लढले नाहीत. सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. यानंतर झालेल्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने बाजी मारली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या हातातून राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ही राज्ये निसटली आहेत. वाजपेयी हयात असते तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते. आज देशभरात भाजपाला जे यश मिळाले त्यात वाजपेयी आणि पक्षाला मोठे करणार्या नेते आणि कार्यकर्त्यांचे असलेले योगदान विसरून चालणार नाही. उत्कृष्ट संसदपटूबरोबरच ते उत्कृष्ट साहित्यिक आणि कवीही होते. संसदेत ते विरोधकांना आपल्या खास शैलीत कोपरखळ्या मारून सभागृह सतत हर्षोल्हासित ठेवत. सभागृहात सर्व त्यांचा आदर बाळगत. त्यांचे सभागृहातील अस्तित्व तरुण खासदारांसाठी प्रेरणादायी ठरत असे.
भारतरत्न, पद्मविभूषण आणि उत्कृष्ट संसदपटू आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानितही करण्यात आले होते. 16 ऑगस्ट 2018 ला त्यांचे देहावसान झाले. त्याआधी बराच काळ ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांच्या अंत्ययात्रेला उसळलेला जनसागर बघता ते किती महान आणि लोकप्रिय होते याची साक्ष पटते. ते आज आपल्यात नसले, तरी त्यांचे कार्य, त्यांचे विचार आणि आचार सर्वांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील, यात शंका नाही. त्यांना विनम्र अभिवादन!