नाशिक

विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त

त्र्यंबकनगरीत पाणीपुरवठा ठप्प; बाप्पाचे आगमन अंधारात

त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
त्र्यंबकेश्वर शहरातील वीज वितरण व्यवस्था कोलमडल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. यावर्षीच्या मे महिन्याच्या अखेरीस अवकाळी पाऊस आणि वादळी वारे यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढलेले नागरिकांनी अनुभवले होते. मात्र त्यावेळेस उन्हाळ्यात आलेल्या पाऊस, वार्‍याने वीज महावितरण यंत्रणेला मॉन्सूनपूर्व कामांसाठी वेळ मिळाला नसेल म्हणून याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. मात्र, दोन-अडीच महिन्यांनी जोरदार पाऊस झाला आणि पुन्हा वीज वितरण व्यवस्था कोलमडली.
गेल्या सहा महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर शहरात अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातही पावसाला सुरुवात झाली तसे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, सलग वीजप्रवाह उपलब्ध न होणे, कमी जास्त दाबाने विजेचा प्रवाह असणे यासारख्या कारणांनी विजेवर चालणारी उपकरणे नादुरुस्त होत आहेत.
सधन रहिवासी आणि मोठे व्यावसायिक यांनी जनरेटर खरेदी करून त्यांच्यापुरता प्रश्न निकाली काढला आहे. मात्र, छोटे व्यावसायिक आणि जनरेटर घेण्याची परिस्थिती नसलेले रहिवासी हतबल झाले आहेत. बॅटरीवर चालणारे इन्व्हर्टरसारखी यंत्रणा सलग वीजपुरवठा नसल्याने कुचकामी ठरली आहे.
श्रावण महिन्याच्या गर्दीच्या कालावधीत रात्री अनेक भागात वीज नसायची, त्यामुळे भाविकांची गैरसोय झाली. त्यात आता गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. मात्र दोन दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावाने ग्रामस्थांना घरातील आरास करणे तसेच सार्वजनिक मंडळांना तयारी करणे अशक्य झाले आहे.
आगमनाचे भव्य सोहळे अंधारात पार पडावे लागत आहेत. वीजपुरवठा काही तास बंद राहिला अथवा वारंवार खंडित झाला, तर त्र्यंबक नगरपरिषदेचा पाणीपुरवठादेखील बंद होतो. त्यातही कमी दाबाने असलेले नळाचे पाणी वरच्या मजल्यावर पोहोचत नाही. वीजपुरवठा सातत्याने खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवस त्र्यंबकनगरीत नळाला पाणी आलेले नाही.

मॉन्सूनपूर्व कामांकडे दुर्लक्ष

मॉन्सूनपूर्व तयारी करताना झाडाच्या फांद्या तोडणे, लोंबकळणार्‍या तारा ओढणे, कललेले अथवा सडलेले खांब व्यवस्थित करणे यांसह अन्य आवश्यक कामांकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. याचा थेट परिणाम जनजीवन विस्कळीत होणे, नागरिकांना आर्थिक फटका बसणे यावर झाला आहे. असा ढिसाळ कारभार राहिल्यास दीड वर्षावर आलेल्या महाकुंभाला कसे सामोरे जाणार, अशी शंका नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

वीज महावितरण ग्राहकांना वेठीस धरत आहे. याबाबत ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात येत आहे. याबाबत ग्राहक न्यायालयातदेखील दाद मागण्यात येईल.
– अमर सोनवणे, संघटक, तालुका ग्राहक पंचायत, त्र्यंबकेश्वर

 

Editorial Team

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

12 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

12 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

12 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

12 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

12 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

13 hours ago