♦ पोलिसांनी सटासट काठ्या फिरवल्या
♦ इंटरनेट सेवा खंडित
♦ मोबाइल जॅमर्स वाढवले
♦ अभिजित दीपके ताब्यात
नवी दिल्ली : प्रतिनिधी
‘नीट-युजी’ परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ ‘कॉक्रोच जनता पार्टी’(सीजेपी)च्या हजारो समर्थक आणि विद्यार्थ्यांनी सोमवारी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काढलेल्या ‘संसद चलो’ मोर्चाला हिंसक वळण लागले. जंतर-मंतरवरून संसदेच्या दिशेने निघालेल्या या मोर्चेकर्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी रायसीना रोड आणि संसद मार्गावर कडेकोट बॅरिकेडिंग केले होते. मात्र, आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि लाठीचार्ज केला. या झटापटीत अनेक आंदोलक आणि 50 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, पोलिसांनी ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दीपके यांच्यासह अनेक आंदोलकांना त्यावेळी ताब्यात घेतले होते.
या तीव्र आंदोलनानंतर केंद्र सरकारने चर्चेची तयारी दर्शवली असून, ‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरव दास आणि आशुतोष रांका यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यासोबतच, रुग्णालयात दाखल असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका करावी आणि नैराश्यातून आत्महत्या केलेल्या ‘नीट’ परीक्षार्थींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी, या प्रमुख मागण्यांचा यात समावेश आहे; ज्यावर सरकारच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा करण्याचे आश्वासन मंत्री नड्डा यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
दरम्यान, गेल्या 23 दिवसांपासून उपोषणावर असलेले आणि सध्या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार घेत असलेले पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी या मोर्चात सहभागी होण्यासाठी रुग्णालयाकडे तात्पुरत्या सुट्टीची मागणी केलीहोती. मात्र, शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणार्या तरुणांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जचा तीव्र निषेध करत, वांगचुक यांनी आपले उपोषण पुढेही सुरूच ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जोपर्यंत ’सीजेपी’च्या युवा नेत्यांना संसदेत खासदारांना भेटण्याची परवानगी दिली जात नाही किंवा त्यांना स्वतः रुग्णालयात भेटण्याची मुभा मिळत नाही आणि सरकार शिक्षणमंत्र्यांची जबाबदारी निश्चित करत नाही, तोपर्यंत आपले उपोषण सुरूच राहील, असा ठाम इशारा वांगचुक यांनी एका पत्राद्वारे
दिला आहे.
दुसरीकडे, ’सीजेपी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोनम वांगचुक यांच्या आवाहनानंतर आणि एका मृत ’नीट’ परीक्षार्थीच्या वडिलांच्या विनंतीवरून आपले बेमुदत उपोषण अखेर मागे घेतले आहे; मात्र शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठीचा हा लढा जंतरमंतरवर यापुढेही सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले. या भव्य मोर्चामुळे आणि उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे संपूर्ण नवी दिल्ली परिसरात कडेकोट पोलीस आणि निमलष्करी दलाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, भारतीय नागरी सुरक्षा संहितेच्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली मेट्रोची 5 महत्त्वाची स्थानके प्रवाशांसाठी तात्पुरती बंद ठेवावी लागल्याने दिल्लीतील जनजीवनावर मोठा परिणाम झाला.
उपोषण सुरूच ठेवणार : वांगचुक
कॉक्रोच जनता पार्टीकडून नवी दिल्लीत जंतर-मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चावर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सोनम वांगचुक यांनी म्हटले आहे. रुग्णालयातून एका टिश्यू पेपरवर संदेश लिहून सोनम वांगचुक यांच्या एक्स खात्यावरून पोस्ट केली आहे. सोनम वांगचुक यांनी म्हटले की, उपोषण सुरू ठेवणार आहे. शांततापूर्ण मार्गाने विरोध करणार्या युवकांसोबत ज्याप्रकारे क्रूर पद्धतीने वागण्यात आले ते पाहता उपोषण सुरू ठेवत असल्याचे वांगचुक म्हणाले. जोपर्यंत युवकांच्या नेत्यांना संसद भवनात खासदारांना भेटण्याची परवानगी मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे वांगचुक यांनी म्हटले.
खा. राऊतांची टीका
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहारांच्या विरोधात दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलकांनी थेट संसदेवर महामोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर, प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करत अनेक मेट्रो स्थानके बंद केली. या संपूर्ण पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’ माध्यमावर पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. तरुणांच्या या मोर्चाला परवानगी नाकारल्याचा संदर्भ देत, राऊत यांनी सरकार या पोरांना घाबरले असून, 56 इंचांची छाती असणार्यांची भंबेरी उडाल्याचा उपहासात्मक टोला लगावला.
लाठीचार्जवरून विरोधक आक्रमक, संसदेत गदारोळ
कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी)च्या समर्थकांना संसदेत नेण्याच्या मोहिमेदरम्यान झालेल्या पोलीस लाठीचार्जवरून विरोधी पक्षांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षाने या लाठीचार्जवर तीव्र टीका करत सरकारवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘युवाविरोधी पंतप्रधान’ म्हटले आहे. जेव्हा निराशेचा महासागर तयार होतो, तेव्हा क्रांती येत असते, असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, ‘सीजेपी’च्या हजारो समर्थकांनी संसदेकडे मोर्चा काढताना बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा दलांनी पार्लमेंट रोडजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज केला, त्याचवेळी राहुल गांधींनी ही टिप्पणी केली. विद्यार्थ्यांसह सीजेपीचे समर्थक संसदेकडे मोर्चा काढत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या.
संसदेकडे मोर्चा काढणार्या सीजेपी समर्थकांवर झालेल्या लाठीचार्जवरून राहुल गांधी यांनी म्हटले की, पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वांत तरुण युवाविरोधी पंतप्रधान आहेत, ते इतके युवाविरोधी आहेत की, ते अयशस्वी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामादेखील स्वीकारू शकत नाहीत. राहुल गांधी यांनी सरकारवर तरुणांच्या अपेक्षा पूर्ण न करता त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला.
राहुल गांधी म्हणाले की, 152 प्रश्नपत्रिका फुटल्या आहेत. साडेसात कोटी विद्यार्थी प्रभावित झाले आहेत आणि एकाही दोषीला शिक्षा झालेली नाही. मग कोणाला शिक्षा झाली? मेहनती तरुणांना, असेही ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, जेव्हा मुले शिक्षणाबद्दल रास्त प्रश्न विचारतात, तेव्हा प्रत्युत्तर म्हणून त्यांना मारहाण केली जाते आणि ताब्यात घेतले जाते. प्रश्नपत्रिका फोडणारे गुन्हेगार मोकाट फिरत आहेत आणि रास्त मुद्दे मांडणार्या विद्यार्थ्यांना फरफटत नेऊन मारहाण केली जाते. हे सरकार तरुणांचे मनोबल खच्ची करत असून त्यांच्यावर हल्ले करत आहे.अखिलेश यादव यांनी म्हटले आहे की, मी निराशेने डोळे गमावले आहेत, जेव्हा समुद्र उलटणार असतो, तेव्हा क्रांती येते. कोणीही पुरेसा मजबूत नाही, जेव्हा तुम्ही उभे राहता, तेव्हा क्रांती येते. दरम्यान, काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीही टीका केली. थरूर यांनी लाठीचार्जला दुःखद म्हटले. जेव्हा आंदोलने हिंसेशिवाय होत आहेत, तेव्हा लाठीचार्जचे कारण काय? मला हा तर्क समजत नाही. ते म्हणाले की, हे सर्वांसाठी चांगले आहे आणि मला समजत नाही की चर्चेची इतकी भीती का आहे. त्यांच्याकडे मोठे बहुमत आहे, त्यामुळे देशाचा आवाज संसदेत ऐकला पाहिजे. हा संसदेचा उद्देश आहे, पण जेव्हा तुम्ही त्यावर बंदी घालता, तेव्हा विरोधी पक्षही नाराज होतील.
विद्यार्थ्यांशी क्रूर व्यवहार का? : प्रियांका
देशातील शिक्षण धोरणातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांवरून काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारच्या शिक्षण धोरणात अनेक मोठ्या समस्या आणि गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यावर सर्वांनी मिळून चर्चा करणे आवश्यक आहे, अशी भूमिका प्रियांका गांधी यांनी मांडली आहे.
‘Cockroach’s’ ‘Sansad Chalo’ march turns violent.
न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…