गारपीटग्रस्त शेतकर्‍यांना 10.12 कोटींची भरपाई

डीबीटीद्वारे मदत वितरण सुरू; 109 गावांतील 9,142 शेतकर्‍यांना लाभ

सिन्नर : प्रतिनिधी
मार्च महिन्यात झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसामुळे सिन्नर तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर कृषी व महसूल विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यांच्या आधारे शासनाने 10 कोटी 12 लाख 27 हजार 706 रुपयांची नुकसानभरपाई मंजूर केली असून, लाभार्थी शेतकर्‍यांच्या बँक खात्यांमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती तहसीलदार सुरेंद्र देशमुख व निवासी नायब तहसीलदार सागर मुंदडा यांनी दिली.
या निर्णयामुळे तालुक्यातील 109 गावांतील 9,142 शेतकर्‍यांना थेट लाभ मिळणार असून, गारपिटीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गारपिटीनंतर आमदार माणिकराव कोकाटे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी कोकाटे यांनी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी
केली होती.
त्यानंतर महसूल व कृषी विभागाला तातडीने पंचनामे करून शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तहसीलदार सुरेंद्र देशमुख व तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर नाठे यांनी संयुक्त पंचनामे करून प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यानंतर शासनाने मदतीस मंजुरी दिली. डीबीटीद्वारे नुकसानभरपाईचे वितरण सुरू झाले असून, ज्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यांनी ती तातडीने पूर्ण करून घ्यावी. त्यामुळे नुकसानभरपाईची रक्कम खात्यात जमा होण्यास कोणताही अडथळा येणार नाही, असे तहसीलदार सुरेंद्र देशमुख म्हणाले.

भरपाईमुळे दिलासा

उन्हाळी कांदा, गहू, डाळिंब आणि द्राक्ष पिकांचे गारपिटीत मोठे नुकसान झाले होते. आमदार माणिकराव कोकाटे यांनी तातडीने पंचनाम्याच्या सूचना दिल्याने मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वाधिक फटका बसलेल्या सोमठाणे परिसरातील शेतकर्‍यांना योग्य प्रमाणात भरपाई मिळाली आहे. इतर गावांनाही नुकसानीच्या प्रमाणात मदत मंजूर झाली असून, उर्वरित शेतकर्‍यांनाही लवकर लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.
– कचेश्वर कोकाटे, शेतकरी, सोमठाणे

सर्वाधिक गारपीटग्रस्त गावनिहाय मंजूर नुकसानभरपाई
गाव           शेतकरी संख्या              भरपाई रक्कम
सोमठाणे                   489                           82,03,470
नायगाव                    489                           63,16,300
देवपूर                        433                           56,04,100
वडगाव पिंगळा          421                            45,61,440
उजनी                        318                           42,81,710
पिंपळगाव                 312                            39,46,835
शिवडे                        319                            37,75,870
सांगवी                      337                            35,63,180
निमगाव देवपूर         309                           26,16,960
किर्तांगळी                 185                            25,96,900

Compensation of ₹10.12 crore for hailstorm-affected farmers

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *