सिंहस्थात गोदाकाठी 12 नवीन घाटांची उभारणी

नाशिक-त्र्यंबकेश्वरला स्नानक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकाठावर 12 नवीन घाट उभारण्यात येत आहेत. भाविकांसाठी उपलब्ध होणारी स्नान व धार्मिक विधींची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. नाशिक महापालिका, महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ आणि जलसंपदा विभाग यांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी ती पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

नाशिक शहरातील घाटांची संख्या सध्या असलेल्या दहा घाटांवरून 20 पर्यंत वाढविण्यात येणार आहे. सुमारे नऊ किलोमीटर लांबीच्या गोदावरी किनार्‍यावर ही विस्तारयोजना राबवली जात आहे. कपिला संगम घाट, नंदिनी संगम घाट, टाकळी संगम ब्रिज घाट, टाकळी संगम घाट, नांदूर-दसक डावा काठ, नांदूर-दसक उजवा काठ, ओढा घाट, सोमेश्वर धबधबा घाट, नवश्या गणपती घाट आणि लक्ष्मीनारायण घाट या दहा नवीन घाटांमुळे एकूण 3,451 मीटर नवीन घाट लांबीची भर पडणार आहे. यासाठी अंदाजे 361.26 कोटी रुपये खर्च अपेक्षित
आहे.
त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीच्या डाव्या व उजव्या काठावर प्रत्येकी एक असे दोन नवीन घाट उभारले जात आहेत. एकूण 3,140 मीटर लांबीची वाढ होणार आहे. जलसंपदा विभागामार्फत सुमारे 146.10 कोटी रुपये खर्चातून ही कामे हाती घेण्यात आली आहेत. मार्च 2027 पर्यंत ती पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर घाटांची रचना करताना गर्दी व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. प्रत्येक घाटासाठी निश्चित क्षमता, पोलिस चौक्या, वॉचटॉवर्स, स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग, आपत्कालीन सेवा मार्ग आणि पार्किंगशी जोडणी यांचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय वस्रांतरगृहे, स्वच्छतागृहे आणि प्रकाशव्यवस्था ही मूलभूत सुविधा म्हणून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सर्व घाटांसाठी एकसंध नामांकन आणि सीमांकन प्रणाली विकसित केली जात आहे. कुंभमेळ्यादरम्यान विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधणे अधिक सुलभ होणार आहे.
अमृत स्नानाच्या दिवशी एकाच वेळी लाखो भाविक स्नानासाठी एकत्र येतात. अशा वेळी सुस्थित आणि स्पष्टपणे व्यवस्थापित घाटक्षेत्र ही सुरक्षिततेची मूलभूत गरज ठरते.
घाट हेच सिंहस्थाचे केंद्रबिंदू आहेत. रस्ते, पार्किंग, आरोग्य सुविधा यांसारखी इतर सर्व पायाभूत व्यवस्था भाविकांना सुरक्षितपणे घाटापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी आहे. त्यामुळे गोदावरीच्या दोन्ही काठांवर घाटांची क्षमता वाढवून आणि त्यांचे आधुनिकीकरण करून सिंहस्थ 2027 च्या प्रमाणाला साजेशी व्यवस्था उभारण्यात येत आहे, असे नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

प्रस्तावित घाट – नाशिक
1. कपिला संगम घाट – 400 मीटर. 2. नंदिनी संगम घाट – 275 मीटर. 3. टाकळी संगम ब्रिज घाट – 400 मीटर. 4. टाकळी संगम घाट – 300 मीटर 5. नांदूर दसक डावा काठ – 500 मीटर. 6. नांदूर दसक उजवा काठ – 570 मीटर. 7. ओढा घाट – 255 मीटर. 8. सोमेश्वर धबधबा घाट – 174 मीटर. 9. नवश्या गणपती घाट – 167 मीटर. 10. लक्ष्मीनारायण घाट – 410 मीटर.
एकूण : 3,451 मीटर
प्रस्तावित घाट – त्र्यंबकेश्वर
1. डावा काठ – 1,614 मीटर. 2. उजवा काठ – 1,526 मीटर
एकूण : 3,140 मीटर

Construction of 12 new ghats along Goda at Simhastha

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *