महुआ बॅनर्जींच्या नियुक्तीवरून पालिकेत वादाची ठिणगी

स्थानिक विरुद्ध परसेवेेतील अधिकार्‍यांत संघर्ष पेटणार

नाशिक : प्रतिनिधी
महापालिका प्रशासनाने परसेवेतील कार्यकारी अभियंता महुआ बॅनर्जी यांच्या नियुक्तीचा डाव घातला आहे. सदर नियुक्ती तत्काळ रद्द करावी. असे न केल्यास म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना रस्त्यावर उतरेल, असा इशारा कामगार सेनेचे अध्यक्ष सुधाकर बडगुजर यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांना दिला आहे. दरम्यान, बॅनर्जी यांच्या नियुक्तीमुळे मनपात स्थानिक विरुद्ध परसेवेतील अधिकार्‍यांत संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.
कार्यकारी अभियंत्यासाठी कोणतेही पद रिक्त नसतानाही बॅनर्जी यांना महापालिका प्रशासनाने पायघड्या का घातल्या, असा सवाल केला जातो आहे. सहा महिन्यांनंतर बॅनर्जी यांच्या नियुक्तीचा घाट प्रशासनाने घातल्याने कामगार सेना चांगलीच संतप्त झाली आहे. स्थानिक अधिकारीदेखील कमालीचे नाराज झाले आहे. दरम्यान, कामगार सेनेचे अध्यक्ष बडगुजर यांनी म्हटले की, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 कलम 53 अन्वये तांत्रिक संवर्गातील कार्यकारी अभियंता पद शंभर टक्के पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे. 28 मार्च 2025 रोजी 8 कार्यकारी अभियंता यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे. त्यानुसार महुआ बॅनर्जी यांच्यासाठी मनपाकडे कुठलीही जागा रिक्त नसताना त्यांना नियुक्ती देणे बेकायदेशीर आहे.
6 जून 2023 च्या सेवाप्रवेश नियमानुसार कार्यकारी अभियंता (स्थापत्य) हे पद 100 टक्के पदोन्नतीचे असून, पदोन्नती दिलेल्या अभियंत्यास चार्ज देणे आवश्यक आहे. कार्यकारी अभियंता या संवर्गातील पदोन्नती केलेली असून, या संवर्गातील कार्यकारी अभियंता उपलब्ध असताना पुन्हा महुआ बॅनर्जी यांना 6 महिने उशिराने पुन्हा मनपा सेवेत वर्ग करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. त्याला म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचा विरोध आहे. महापालिकेकडे कार्यकारी अभियंता पदासाठी सक्षम उमेदवार उपलब्ध न झाल्यास प्रतिनियुक्तीकरिता शासनाकडील समकक्ष पदावरील किमान 5 वर्षांचा अनुभव असावा असा शासन निर्णय आहे. बनर्जी त्यांच्या सेवाज्येष्ठता यादीनुसार पाच वर्षाचा अनुभव पूर्ण करीत नाही. बॅनर्जी 1 जून 2021 रोजी कार्यकारी अभियंता पदावर रुजू झालेल्या आहेत. त्यामुळे अर्हता प्राप्त करत नसून त्यांना दिलेली नियुक्ती त्वरित रद्द करावी अन्यथा कर्मचारी संघटना तीव्र निषेध करेल, असा इशारा देण्यात आला.

नियुक्ती होताच बॅनर्जींना बक्षिसी

कार्यकारी अभियंता महुआ बॅनर्जी यांची नियुक्ती होताच त्यांना टेंडर सेल प्रमुख करण्यात आल्याने यामुळे महापालिकेत चांगलेच नाराजीनाट्य रंगले आहे. विशेष म्हणजे, सेवाजेष्ठता यादीनुसार पाच वर्षांचा अनुभव नसतानाही बॅनर्जी यांच्यासाठी केलेला खटाटोप यामुळे महापालिकेत खळबळ उडाली आहे.

महुआ बॅनर्जी यांना प्रशासनाने कुठल्याही परिस्थितीत नियुक्ती देऊ नये. म्युनिसिपल कर्मचारी सेना कदापि हे सहन करणार नाही. त्यांना दिलेली नियुक्ती रद्द करावी. अन्यथा कामगार सेना रस्त्यावर उतरून कामबंद आंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.
– सुधाकर बडगुजर, अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *