डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील कर्मचार्यांचा उर्मटपणा
सिडको : विशेष प्रतिनिधी
ग्रामीण भागात वैकुंठरथ सुविधा नसल्यामुळे मृतदेहाची हेळसांड झाल्याच्या घटना ऐकायला मिळतातच. मात्र, आता अशा दुर्दैवी घटना शहरातही घडू लागल्या आहेत. नवीन नाशिक येथील सिंहस्थनगर परिसरात बारकू बंडू कापडणीस या ज्येष्ठ नागरिकाचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी वैकुंठरथ अथवा शववाहिका मिळावी, यासाठी सकाळी साडेआठच्या सुमारास महापालिकेच्या डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयाशी संपर्क साधण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते गोविंद घुगे, अक्षय परदेशी, आतिष पाटील यांनी वैकुंठरथासाठीची विनंती केली असता, रुग्णालयातील कर्मचार्यांनी सुरुवातीला ‘दहा वाजेनंतर फोन करा’ असे सांगितले. दहा वाजता पुन्हा संपर्क साधल्यानंतर ‘साडेअकरानंतर गाडी येईल’ असे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर अनेक वेळा फोन करूनही वैकुंठरथ आलाच नाही. या वेळी रुग्णालयातील कर्मचार्यांनी फोनवर उध्दटपणाने बोलत तुम्ही सिडको विभागाकडून गाडी मागवा, आमच्याविरुद्ध तक्रार करायची असेल तर करा, असे उत्तर दिले. मृतदेह घरात जास्त वेळ ठेवणे शक्य नसल्यामुळे मृताच्या नातेवाइकांनी शेवटी छोटा हत्ती हे मालवाहू वाहन बोलावून मृतदेह मोरवाडी अमरधाम येथे नेला व अंत्यसंस्कार केले.या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांकडून डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयातील कर्मचार्यांच्या अशा वर्तणुकीचा निषेध करण्यात येत आहे.