♦ तळेगाव शिवारात पोलिसांचा छापा
♦ पाच संशयितांना अटक
♦ आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश
♦ लाखोंचा मुद्देमाल जप्त
त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगाव शिवारात रसायनांचा (केमिकल) वापर करून बनावट भारतीय चलनी नोटा तयार करणार्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
केला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे 12 ऑगस्ट 2026 रोजी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा, नाशिक शहर पोलीस, त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पथक आणि फॉरेन्सिक टीमने तळेगाव फाट्याजवळील हिरामण दाते यांच्या बंगल्यावर संयुक्त छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी संशयितांना रंगेहाथ ताब्यात घेतले.त्यात अमरेश्वर सुधाकर आईथा (वय 37, रा. प्रेमनगर, हैदराबाद, तेलंगणा), दासहरी प्रसाद सत्यई (वय 36, रा. येल्लारेडी, जि. सिरसिल्ला, तेलंगणा), गोकुळ आनंदराव दाते (वय 56, रा. सिद्धी पार्क, गंगापूर रोड, नाशिक), हिरामण पुंजा दाते (वय 56, रा. तळेगाव, जि. नाशिक), मच्छिंद्र भगवान घनदाट (वय 48, रा. सातपूर, नाशिक) यांचा
समावेश होता
कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 9 लाख 75 हजार रुपये (500 रुपयांच्या 1950 खर्या नोटा), कोर्या कागदांच्या नोटांच्या आकाराचे बंडल, रासायनिक द्रव (केमिकल), आयोडीन व नोटा छापण्याचे साहित्य. मोबाइल फोन व एक चारचाकी वाहन, असा एकूण 12 लाख 19 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता
विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार या आंतरराज्यीय टोळीच्या मुळाशी जाण्यासाठी पुढील तपास करीत आहेत.
रसायन वापरून कशी करायचे बनवाबनवी?
पोलिसांनी केलेल्या चौकशीत आणि पंचांसमक्ष संशयितांनी फसवणुकीची अनोखी पद्धत कबूल केली.
छापण्याची पद्धत : 500 रुपयांच्या खर्या नोटेला विशेष रसायन लावून ती नोट कोर्या कागदावर ठेवून लाटण्याने लाटली जात असे. त्यामुळे त्या कागदावर नोटेची फिक्कट प्रतिमा उमटत असे. त्यानंतर ही नोट आयोडीनच्या द्रावणात बुडवून सुकवली जात होती.
फसवणुकीचा फंडा : घटनास्थळावर 500 रुपयांची खरी नोट आणि त्याखाली नोटेच्या आकाराचे काळे कागद ठेवून 30 लाख रुपये असल्याचा भास निर्माण करण्यात आला होता.
10 लाखांत 30 लाख : 10 लाख रुपयांच्या खर्या नोटांच्या बदल्यात हे 30 लाख रुपयांचे बनावट बंडल देण्याचा कट होता. फसवणूक उघडकीस येऊ नये म्हणून “काही दिवस हा बॉक्स उघडू नका, अन्यथा शाई उडून जाईल“ अशी बतावणी ग्राहकांकडे केली जात होती.
Counterfeit currency factory busted